मुक्ताईनगर : प्रतिनिधी
तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे एक विचित्र घटना घडली आहे. आपली बायको माहेरी गेल्यानंतर आपल्या आई-वडिलांनीच त्याला फुस दिल्याच्या संशयातून सख्ख्या मुलाने त्यांची घर जाळून टाकले आहे. ही घटना मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द गावात घडली आहे.
सविस्तर असे की, या घटनेतील संशयित आरोपी समाधान भीमराव घोडकी याची बायको अलीकडेच तिच्या माहेरी गेली होती. आपले आई-वडील यांच्यामुळेच बायको माहेरी गेल्याचा संशय त्याच्या मनात बळावला. त्यावरून त्याने आई-वडिलांना धमकावलेही होते. त्यानंतर बापावरती संशय घेत दगड घेऊन तुम्हाला मारतो, असे धमकावत त्याने सर्व घरातील वस्तू जाळून टाकल्या. त्यात किमान आठ हजार रुपये किमतीचे संसार उपयोगी, कपडे, धान्य, गादी, पलंग आणि घरातील इतर साहित्य जळून खाक झाल्या आहेत. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला समाधान घोडकी याची आई सुरजाबाई भिमराव घोडकी यांच्या फिर्यादीवरून त्याच्या विरोधात भादंवि कलम ४३६,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास स.फौ. संजीव पाटील करत आहेत.