साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील मांडळ येथे गुरुवारी, १० ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एकाचवेळी वेगवेगळ्या सात ठिकाणी चोरांनी दुकानांसह घरफोडी केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी मारवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, महेश जैन यांच्या किराणा दुकानातून अंदाजित २५ ते ३० हजार रुपये तर निलेश पाटील कृषी केद्राचे कुलूप तोडून लँपटॉप, रोख ३० हजार व वाल्मिक पाटील रेशन दुकानदार यांच्या गोदामातून ज्वारीची गोणी, दोन ते तीन हजार रोख तसेच अमोल सोनार यांच्या दत्तात्रय ज्वेलर्स या दुकानातून ४०० ग्रॅम चांदी तर १६ ग्रॅम सोने इतर दोन हजार रोख तर कमलाकर अहिरराव यांच्या ज्वेलर्स दुकानातून सहा ते सात हजार रुपये रोख चोरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
वावडे येथून बोरेलो गाडीचीही चोरी
घटनास्थळी मारवड पोलीस ठाण्याचे पी.एस.आय. विनोद पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला. वावडे येथून त्याच रात्री बोरेलो गाडी चोरीस गेल्याची चर्चा आहे. चोरट्यांनी त्याच गाडीतून मांडळ गावात प्रवेश करत दुकानांसह घरफोडी केली असावी, असा अंदाज ग्रामस्थांमधून वर्तविला जात आहे.