साईमत, प्रतिनिधी, जळगाव
शहरात गेल्या महिन्यात शिवाजीनगर-हुडको भागात लहान मुलांच्या भांडणावरून, तसेच के.सी. पार्कजवळ वाळूमाफियांकडून खंडणी वसुलीसाठी गोळीबाराच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या होत्या. या घटना ताज्या असतानाच औद्योगिक वसाहतीतील फातिमानगर भागात पुन्हा गुरुवारी सकाळी 11 वाजता गोळीबाराची घटना घडल्याने पोलिसांचा धाक संपला की काय? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोफ्लदवण्यात आला असून कुसुंबा येथील स्वप्नील उर्फ सोपान चंदुसिंग परदेशी (वय 25) या संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एमआयडीसी परिसरातील व्ही. सेक्टरमधील प्रभा पॉलिमर कंपनीसमोर गुरूवारी सकाळी 11 वाजता जुन्या वादातून स्वप्निल परदेशी व आकाश तवर यांच्यात शाब्दिक वाद झाला. या रागातून स्वप्निल परदेशी याने कमरेला लावलेला गावठी कट्टा काढून आकाशवर दोन वेळा गोळीबार केला. सुदैवाने यात आकाशला कोणतीही दुखापत झाली नाही. ही घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. व्ही .सेक्टरमध्ये गोळीबार झाल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून संशयित आरोपी सोपान परदेशी याला ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस पोलिसांनी हस्तगत केले आहे.
16 हजारांत खरेदी केला कट्टा
गावठी कट्टा 16 हजार रुपयांत खरेदी केल्याचे तसेच सोबत तीन काडतूसही घेतल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सपोनि दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, सचिन पाटील, इम्रान सैय्यद आदींनी घटनास्थळी धाव घेतली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि. हिरे करीत आहेत.