पीडित बालिकेच्या कुटुंबियांचे आ.मंगेश चव्हाण यांनी केले सांत्वन

0
10

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे घडलेल्या अमानवीय घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकलीच्या घरी रविवारी आ.मंगेश चव्हाण यांनी भेट देऊन परिवाराचे सांत्वन केले. यावेळी चाळीसगाव पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपिल पाटील आदी उपस्थित होते.

पीडित बालिकेचे वडील दिव्यांग आहेत. घरही लाकडी फळ्या लावलेले पत्र्याचे आहे. त्यांची अतिशय साधारण अशी आर्थिक परिस्थिती आहे. छोटीशी टपरी चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाला आ. मंगेश चव्हाण यांनी १ लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली. तसेच शासनाच्या माध्यमातून कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी तसेच आरोपीवरील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू करून लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आ.चव्हाण यांनी आश्वासन दिले.

भाजपाच्या चित्रा वाघ यांनीही फोनवरुन घेतली माहिती
अतिशय दुर्दैवी अश्या या घटनेने समाजमन ढवळून निघाले आहे. त्यामुळे सर्वांनीच त्याची गंभीर दखल घेतली आहे. पीडितेच्या घरी असतानाच भाजपाच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही फोनवर संपर्क करून घटनेची माहिती घेतली. तसेच दोन दिवसात कुटुंबियांना भेट देणार असल्याचे आ.चव्हाण यांनी सांगितले.

घटनेची गांभीर्याने विचार करण्याची गरज
अश्या घटना का घडतात? समाजात अश्या विकृत मानसिकता का फोफावत आहे, त्याचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. या घटना रोखणे ही आता कायद्यासोबतच सामाजिक जबाबदारी बनली असल्याची प्रतिक्रिया आ.मंगेश चव्हाण यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here