भुसावळ : निलेश वाणी
जिल्हा परिषद , पंचायत सामिती व नगर परिषदेची निवडणूक तोंडावर आहे. सध्या राज्यातील राजकीय वातावरण काही प्रमाणात गढुळच आहे, त्याचे पडसाद भुसावळ च्या राजकारणावर पडलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होणार असून कसोटी मात्र नेतृत्वाची लागणार आहे. कार्यकर्ते संभ्रमात असून ऐनवेळी अनपेक्षित घटना घडू शकतात . जुने व नवे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. आज पर्यंतचा इतिहास पाहता नव्यांनाच संधी मिळत असल्याने नेत्यांचीही कसोटी लागणार आहे.
भुसावळ हे कॉस्मो पॉलिटिन शहर आहे. येथील राजकारणावर माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे , माजी मंत्री आ. संजय सावकारे व माजी आ . संतोष चौधरी यांची पकड आहे. आ. एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आहेत. २०१७ च्या नगर परिषदेच्या निवडणुकीत आ. खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन खाविआ चे नगरसेवकांनी भाजपा प्रवेश केला होता तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी सुद्धा भाजपात प्रेवेश केला होता. त्यावेळी भाजपात नवे – जुने शीत संघर्ष होऊन अनेक ठिकाणी नव्यांना उमेदवारी मिळाली होती. आ. खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचा अनेक समर्थकांनी जळगाव येथील कार्यक्रमात एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष तत्कालीन ना. जयंत पाटील यांच्या उपस्थतीत पक्षात प्रेवेश घेतला.
भुसावळ नगर परिषदेच्या अनेक नगरसेवकांनी अपात्रतेची नामुष्की नको म्हणून स्वतः ऐवजी कुटुंबातील सदस्यांना पक्ष प्रेवेश करून घेतला पदाधिकार्यांची हि यादी भली मोठी होती. यांनतर भुसावळ येथील मेळाव्यात तत्कालीन उपमुखमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत काही नगरसेवकांनी भाजपातून एनसीपीत प्रवेश घेतला उल्लेखनीय म्हणजे नगर परिषदेचा कार्यकाळ काही दिवसांचा बाकी असतांना पक्षांतर करण्यात आले होते. या पक्षांतरामुळे भाजपा खिळखिळी होत होती.
माजी मंत्री एकनाथराव खडसे विधान परिषदेचे सदस्य झाले आणि कार्यकर्त्यामध्ये उत्साह संचारला. पण राज्यतील सत्तांतराच्या घडामोडी सुरु झाल्या अनपेक्षितपणे सत्तांतर झाले. अशातच राजीनामा न देता कार्यकाळ संपण्यापूर्वी पक्षांतर केले म्हणून भुसावळच्या नागराध्यक्षांसह १० जणांना अपात्र करण्यात आले. याचा धक्का भुसावळच्या राजकारणाला बसला आहे. पक्षप्रवेश पूर्वी राजीनामा देणे किंवा कार्यकाळ पूर्ण होई पर्यंत पक्षांतर थांबविणे याचा विचार झाला नसावा का ? हा प्रश्न भुसावळकरांना पडला आहे. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये जुने व नवे असा शीत संघर्ष सुरु होत होता. माजी आ. संतोष चौधरी यांनी जेव्हा दिलीप भोळे यांचा निवडणुकीत पराभव केला होता तेव्हा शिवसेनेतून अनेकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता. काही जणांनी संघटनेची पदे सुद्धा भूषविली होती. त्यामुळे अशा लोकांनी पक्षांतर म्हणण्यापेक्षा घर वापसी म्हणणे सुरु केले होते. भाजपात जुने नवे असा शीत वाद होऊन नव्यानां ज्या प्रमाणे संधी मिळाली होती तशीच अनाहूत भीती एनसीपीच्या जुन्या गोटात पसरली होती. परंतु राज्यात सत्तांतर झाल्याने अनेकांनी पुन्हा जय श्रीराम चा नारा देण्यास सुरुवात केली आहे.
महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर असतांना अनेकांनी शिवसेनेशी जुळवून घेतले. तत्कालीन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जंगी सत्कार भुसावळ शहरात करण्यात आला होता. सत्कार प्रसंगी जुने व नवे कार्यकर्ते असा अप्रत्यक्ष संघर्ष झाला. काही पदाधिकारी ना. पाटील यांचा सत्कार करण्यासाठी एका ठिकाणी जमले होते पण काही कायकर्ते ना. पाटील यांना थेट बियाणी स्कुलच्या ठिकाणी घेऊन गेले. राज्यतील आघाडी सरकार त्यातच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी एनसीपीत प्रवेश केल्याने भाजपातील काही नगरसेवकांनी शिवसेनेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेत जुने व नवे असा अंतर्गत वाद सुरु झाला होता. या वादामुळे पदाधिकार्यांच्या नियुक्त्याही लांबल्या असल्याचे समजते . पण राज्यात सत्तांतर झाल्याचा परिणाम भुसावळ शिवसेनेवरही झाला. नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी वरून पक्षात गट पडले . अशातच राज्यातील सत्तांतर नंतर शिवसैनिकांनी ठाकरे यांच्या सोबत राहण्याचा पावित्रा घेतला. सध्या शिवसेनेच्या शिंदे गटा सोबत भुसावळ मधील कोणीही दिसत नसले तरी अनेक समर्थक माजी मंत्री आ. गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क ठेऊन आहेत काही जण त्यांना भेटून आले असल्याचेही समजते. नगर परिषद निवडणूक भाजपा व शिवसेना शिंदे गट युती म्हणून लढविली तर उमेदवारीच्या खात्रीची चाचपणीही सुरु आहे.
माजी मंत्री आ. संजय सावकारे यांना भाजपात आ. एकनाथराव खडसे यांनी आणले हे जगजाहीर आहे. राज्यातील मविआ सरकार सत्तेवर असतांना आणि एकनाथराव खडसे राष्ट्रवादी मध्ये गेल्याने भाजपाची पडझड थांबविण्याचे आव्हान त्यांच्या समोर होते. जुने भाजपेयी व आ. सावकारे समर्थक हे भाजपात च राहिले पण जे एकनाथराव खडसे व आ. संजय सावकारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपात आले होते, पक्षाने ज्यांना संधी दिली होती असे अनेक जण भाजपा सोडून जात होते. नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात भाजपाला गळती लागेल असेही बोलले जात होते. पण राज्यातील सत्तांतर नंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवउत्साह संचारला आहे. राजकीय घडामोडी पाहून अनेकांनी जय श्रीराम केले आहे.
माजी आ. संतोष चौधरी यांच्या गटात सध्या तरी शांतता आहे. कदाचित हि वादळा पूर्वीची शांतता असू शकते. आ. एकनाथराव खडसे आणि माजी आ. संतोष चौधरी एनसीपीत आहेत. चौधरी यांचे बंधू अनिल चौधरी हे प्रहार संघनेचे पदाधिकारी आहेत. २०१७ च्या निवडणुकीत माजी आ. चौधरी यांनी शिवबंध तोडून जनाधार पक्षाकडून सचिन चौधरी यास नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरविले. भाजपा आणि जनाधार पार्टीमध्ये तुल्यबळ लढत झाली होती. माजी आ. संतोष चौधरी कुठला राजकीय डाव टाकतात यावरही भुसावळ नगर परिषदेच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.