चोपडा – प्रतिनिधी
येथील नगरपरिषद क्षेत्रातील कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजना मोहिमेमध्ये कर्तव्य पार पाडतांना कोरोनाची लागण होऊन मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचारी यांना सानुग्रह सहाय्य अनुदान देणेचा शासनाने धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. चोपडा नगरपरिषद आस्थापनेवरील मयत कर्मचारी कै.प्रताप माधवराव बाविस्कर, शिपाई यांचे कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजना मोहिमेत कर्तव्यावर असतांना कोव्हिड-19 चे संक्रमणामुळे मृत्यू झालेने तसेच कै.संजय जिजाबराव साळुंखे, मजुर, पाणीपुरवठा विभाग यांचे अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावत असतांना कोव्हिड-19 चे संक्रमणामुळे मृत्यू झाल्याने त्यांचे पात्र वारसांना सानुग्रह सहाय्य अनुदान मिळणेकामी चोपडा नगरपरिषदतर्फे शासनास प्रस्ताव सादर करणेत आलेला होता.
चोपडा नगरपरिषदेतर्फे शासनाकडे पाठविलेले उक्त दोन्ही मयत कर्मचारी यांचे प्रस्ताव मंजुर झाले. प्रती मयत कर्मचारी रक्कम रु.50 लक्ष मात्र याप्रमाणे एकूण 1 कोटी रुपये सानुग्रह सहाय्य अनुदान नगरपरिषदेस प्राप्त झाले. त्याअनुषंगाने दि.12/04/2022 रोजी मुख्याधिकारी यांचे दालनात मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांचे हस्ते दोन्ही मयत कर्मचारी यांचे वारस हेमलता प्रताप बाविसकर व वैशाली संजय साळुंखे यांना प्रत्येकी 50 लाख रुपयाचे सानुग्रह सहाय्य अनुदानाचे धनादेश वितरीत करणेत आले. यावेळी माजी नगराध्यक्षा मनिषा जीवन चौधरी, उपमुख्याधिकारी निलेश ठाकुर, सहा.कार्या.निरिक्षक प्रविण मराठे तसेच चोपडा नगरपरिषदेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
