राज्यात शिक्षकांची 80 टक्के रिक्त पदे लवकरच भरणार

0
20

जळगाव : प्रतिनिधी

राज्यात सुरुवातीला शिक्षकांची पन्नास टक्के रिक्त पदे भरले जातील. आधार व्हेरिफिकेशन संदर्भात असलेल्या अडचणी दूर झाल्यानंतर 80 टक्के रिक्त पदांची भरती करण्यात येईल. अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज फैजपूर येथे दिली.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या 62 व्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनाचा फैजपूर येथे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय पाटील होते. आमदार शिरीष चौधरी, कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे. के. पाटील,मागील अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाष माने, उपाध्यक्ष महेंद्र गणपुले, विजय पवार, सारथीचे संचालक विलास पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, सचिन परदेशी, एजाज शेख आदी उपस्थित होते.
शिक्षणमंत्रीकेसरकर म्हणाले की, टप्पा अनुदानाच्या बाबतीत 31 डिसेंबरपूर्वी निर्णय घेतला जाईल. पवित्र पोर्टलवरील रिक्त पदांच्या शिक्षक भरतीसाठी रोस्टर पूर्ण असणे आवश्यक आहे सर्वांनी रोस्टर पूर्ण करून ठेवावे. जिल्हा परिषदांची रिक्त पदांची भरती झाल्यानंतर लगेच खाजगी माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 2005 पूर्वी नेमणूक झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल.
समूह शाळा, दत्तक शाळेचेे उद्देश कोणतीही शाळा बंद करणे नसून सर्व शाळांना उत्तम शिक्षण व सुविधा मिळणे हे आहे याबद्दल गैरसमज करू नये. सर्व शाळांना शासकीय शाळेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करणार आहे, असे झाले तर केंद्राकडून अनेक सुविधा सर्व शाळांना मिळतील. पुढील वर्षापासून व्यावसायिक शिक्षणावर भर दिला जाणार आहे कृषी विषयाचा समावेश अभ्यासक्रमात केला जाणार आहे.शालेय पोषण आहारामध्ये आठवड्यातून एकदा अंडे दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
आज सकाळच्या सत्रात शोधनिबंध सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्यातर्फे सादर करण्यात आला. त्याचा विषय माध्यमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकासात मुख्याध्यापकाची भूमिका हा होता. राज्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या 54 मुख्याध्यापकांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सूत्रसंचालन आर.डी.निकम, प्रशांत वाघ, मनीषा पाटील, शेखर पाटील यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here