अहमदाबाद : वृत्तसंस्था
देशाच्या 25 राज्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. सर्वाधिक फटका गुजरातला बसला आहे. राज्यात पुरामुळे गत 24 तासांत 7 जणांचा, तर मागील 2 दिवसांत तब्बल 65 जणांचा बळी गेला आहे. अहमदाबादेत रविवारी रात्री 219 मिमी पाऊस झाला. तर सूरतसह 6 जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दुसरीकडे, मध्य प्रदेश व राजस्थानात सोमवारी मुसळधार पाऊस झाला. हवामान खात्याने एमपीच्या भोपाळ, इंदूर व जबलपूरसह 33 जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. या ठिकाणी पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर बिहार, झारखंड व उत्तर प्रदेशच्या काही भागांना अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. येथे 4 दिवसांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.
मागील 24 तास: गुजरातमध्ये गत 3 दिवसांपासून पाऊस सुरू आहे. रविवारी रात्री अहमदाबादेत तब्बल 219 मिमी पाऊस झाला. यामुळे रस्ते व नागरी वस्त्या जलमय झाल्या. सोमवारी शहरातील सर्वच शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आले. राज्य आपत्ती व्यवस्थापन मंत्री राजेंद्र त्रिवेदी यांनी आतापर्यंत 9 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे सांगितले. तर 468 जणांना रेस्क्यू करण्यात आले.
पुढील 24 तास: सूरतसह 6 जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होण्याचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यांतील 13 धरणे हाय अलर्टवर आहेत. येथे NDRF सह तटरक्षक दलांनाही अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.