होर्डिंगबाजीला फाटा देत जळगाव मनसेकडून ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण!
जळगाव साईमत प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जळगाव मनसेच्या वतीने एक नवा आणि पर्यावरणपूरक आदर्श घालून देण्यात आला आहे. राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही दिखाऊपणा किंवा अवाजवी खर्च न करता, शहरातील गजबजलेल्या आकाशवाणी चौकातील सर्कलमध्ये ५० बोगनवेलींच्या रोपांची लागवड करण्यात आली. ‘केवळ झाडे लावायची नाहीत, तर ती जगवायची’ हा राजसाहेबांचा विचार डोळ्यासमोर ठेवून या झाडांच्या संरक्षणाची आणि रोज पाणी घालण्याची संपूर्ण जबाबदारी मनसे सैनिकांनी अंगावर घेतली आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या वाढदिवशी होर्डिंगबाजी किंवा फटाक्यांची आतिषबाजी न करता पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबवण्याचे आदेश दिले होते. साहेबांच्या याच आदेशाचे तंतोतंत पालन करत जळगाव मनसेने आकाशवाणी सर्कल सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्याचा विडा उचलला. या परिसरात येत्या आठवडाभरात आणखी १०० बोगनवेलींची लागवड केली जाणार आहे. विशेष म्हणजे, मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दररोज संध्याकाळी स्वतः या रोपांना पाणी घालणार आहेत.
हा वृक्षारोपण उपक्रम सुरू असतानाच, जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर दीपमाला काळे या त्या मार्गाने जात होत्या. मनसेचा हा अनोखा उपक्रम पाहून त्यांनी आपला ताफा थांबवला आणि स्वतः एक रोप लावून या मोहिमेचे कौतुक केले. त्यांच्या या सरप्राईज सहभागामुळे उपस्थित मनसे कार्यकर्त्यांचा उत्साह अधिकच वाढला. महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख प्रकाश पाटील यांनीही या उपक्रमाला उपस्थित राहून मनसेच्या सामाजिक उत्तरदायित्वाला दाद दिली.
‘माझं शहर, माझी जबाबदारी’ संस्थेची मोलाची साथ
या मोहिमेत जळगावात पर्यावरणासाठी काम करणाऱ्या “माझं शहर, माझी जबाबदारी” या संस्थेने उत्स्फूर्त सहभाग घेतला. संस्थेचे सुहास दुसाने, डॉ. लीना पाटील, प्रा. विशाल पाटील, प्राजक्ता चौधरी, विलास बरडे आणि राजेंद्र राणे यांनी स्वतः प्रत्यक्ष श्रमदान करत वृक्षारोपण यशस्वी केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, डॉ. अनुज पाटील, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, चेतन पवार, प्रकाश जोशी, शहर सचिव जितेंद्र पाटील, राहुल चव्हाण, साजन पाटील यांच्यासह शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, महिला शाखाध्यक्ष अनिता कापुरे, लक्ष्मी भील आणि मनसेचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज ठाकरे वाढदिवसानिमित्त जळगाव मनसेने राजकीय चिखलफेकीपेक्षा ‘पर्यावरण संवर्धन’ किती महत्त्वाचे आहे, याचा एक नवा आणि थेट संदेश जळगावकरांना दिला आहे.
