साईमत न्यूज नेटवर्क –
मुंबई : मीरा रोड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. आईच्या कथित बॉयफ्रेंडने केवळ क्षुल्लक कारणावरून तिच्या 4 वर्षांच्या निरागस मुलाची निर्घृण हत्या केल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शंभू शर्मा हा मृत मुलाच्या आईसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेच्या दिवशी घरात असताना आरोपीने मुलाला अमानुष मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपीने हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात समोर आले आहे. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या पंचनाम्यात मुलाच्या शरीरावर संशयास्पद जखमा आढळून आल्या. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
शवविच्छेदन अहवालात मुलाचा मृत्यू गंभीर मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
