जिल्ह्यात सर्पदंशाने चार महिन्यात २३ जणांचा बळी

0
13

साईमत जळगाव प्रतिनिधी

जिल्ह्यात सर्पदंशामुळे मागील चार महिन्यात 23 जणांचा मृत्यु झाला आहे. तर 13 जण किरकोळ जखमी आहेत. तेव्हा सर्पदंशावर वेळीच दक्षता घेण्याची गरज आहे. सर्पदंश झाल्यावर तात्काळ वैद्यकीय मदत मिळणे शक्य नसते व ती मिळण्यापूर्वी केलेले उपचार म्हणजेच प्रथमोपचार होय. आतापर्यंत बऱ्याच सर्पदंशाच्या प्रकरणांत या प्रथमोपचारामुळेच किती तरी लोकांचे प्राण वाचलेले आहेत. त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे. सर्पदंशावर वैद्यकीय पथकांच्या मदतीने उपचार करावेत. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जळगाव जिल्ह्यात वन्यजीव संरक्षण संस्था सर्प मानव आणि पर्यावरण या विषयावर शून्य सर्पदंश अभियान राबवित आहे. यातून जनजागृती, सर्पदंश, प्रथमोपचार, आणि अंधश्रध्दा निर्मुलन यावर कार्य करत आहेत. तर संस्थेचे सर्पमित्र वनविभागाच्या मार्गदर्शनात सर्प रेस्क्युचे काम करत असतात. आतापर्यंत सर्पदंशाच झाल्यावर सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. दंश झाल्यावर असे उपचार तात्काळ शक्य होतात असे नाही. अशावेळी डॉक्टरांकडे जाईपर्यंत प्रथमोचार जीवनावश्यक असतात. पावसाळा सुरू झाला की शेतकरी शेतीची कामे करायला लागतात, अडगळीत पडलेल्या वस्तू बाहेर काढल्या जातात, जनावरांचे गोठे साफ होतात. जळाऊ सरपण काढले जाते, शेती मशागतीच्या कामांना वेग येतो हाच काळ असा आहे. ज्यात सापांचा वावर वाढतांना दिसून येतो अनेक नागरिक सापांना मारतात तर काही नागरिक साप वाचवण्यासाठी प्रयत्न करतात अश्यावेळी सापाचा आणि नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी सर्पमित्र मोलाची भूमिका बजावतात.
सर्पमित्रांनी साप वाचवल्यावर उपस्थित जनसमुदायास सर्प अंधश्रद्धाबद्दल जागृत करून वैद्यकीय उपचाराचे महत्त्व समजावून त्या बाबत मार्गदर्शन करावे. सोशल मीडियावर प्रसिध्दी साठी सपासोबत स्टंट किंवा फोटो सेशन व्हिडिओ बनवू नये. घरात सर्प संग्रह करू नये. जनजागृती करतांना जीवंत सापांचे प्रदर्शन करू नये . नागरिक स्वतःचा आणि सापाचा जीव वाचवण्यासाठी सर्पमित्रांना कॉल करतात. अशावेळी पेट्रोल चार्ज च्या नावाखाली अवास्तव रक्कम मागू नका. सर्प वाचवणे आपले कर्तव्य आहे. पण रिकामे धाडस करू नये स्वतःचा जीव वाचवणार तरच सर्प वाचवता येतील असे आवाहन वन्यजीव संरक्षण संस्थेने केले आहे.
सर्पदंशाच्या अंधश्रध्दांवर विश्वास ठेवू नये
साप कधीही तुम्हाला स्वतःहून पूढे येऊन चावत नाही , साप डूख धरत नाही, सापाला आपल्या सारखी तीक्ष्ण दृष्टी नसते, त्याला हात ,पाय, बाह्यकान देखील नसतात कुणाचा चेहरा लक्षात राहील इतका त्याचा मेंदू तल्लख नाही म्हणून कोणताच साप बदला घेत नाही. साप चावला म्हणजे मृत्यू नाही प्रत्येक साप विषारी नसतो आणि विषारी सर्पदंश झाला तरी योग्य वेळेत योग्य वैद्यकीय उपचार केले तर रुग्ण 100% वाचतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here