लेवा पाटीदार समाज सामुहिक सोहळ्यात २३ विवाह

0
15

समाजाशी बांधिलकी जोपासत प्रत्येकाला पुढे येण्याचे आ. एकनाथराव खडसे यांचे आवाहन

लेवा पाटीदार समाज सामुहिक सोहळ्यात २३ विवाह

जळगाव (प्रतिनिधी)-

सध्या विवाहांमध्ये होणारा खर्च टाळणेसाठी सामुहिक विवाह सोहळा ही काळाची गरज बनली आहे. समाजाची बांधीलकी जोपासण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन योगदान दिले पाहिजे. वधूवरानी भविष्यात कुरबुरी न करता समजंसपणे संसार करावा, असे प्रतिपादन माजीमंत्री तथा विधानपरिषदेचे आ. एकनाथराव खडसे यांनी केले.

लेवा एज्युकेशनल युनियन, अखिल भारतीय लेवा युवक महासंघ व बहिणाई ब्रिगेड यांचे संयुक्त विद्यमाने लेवा पाटीदार समाजातील वधु – वरांचा सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन २३ मार्चरोजी सकाळी लेवा बोर्डीगचे प्रांगणात करण्यात आले. या सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये २३ वधुवरांचा सहभाग होता. लेवा पाटीदार समाजामध्ये १९९५ नंतर मोठ्या प्रमाणात सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन जळगांव शहरात करण्यात येते आहे.

यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी आ. एकनाथराव खडसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ. राजूमामा भोळे, कुटुंबनायक ललित पाटील, भोरगाव लेवा पंचायतीचे सचिव ॲड. संजय राणे, लेवा एज्युकेशनल युनियनचे उपाध्यक्ष उल्हास चौधरी, सचिव प्रा. व. पु. होले, ॲड. प्रकाश पाटील, उद्योजक भालचंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणीताई खडसे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष केतकी पाटील, माजी महापौर आशाताई कोल्हे, सिंधुताई कोल्हे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, ॲड. केतन ढाके आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीला चिमुकले राम मंदिर येथून सर्व नवरदेवांची वरात वारकरी संप्रदायामधील वारकऱ्यांंच्या दिंडीसोबत सकाळी निघाली होती. नंतर विवाहस्थळी लेवा बोर्डीग येथे नवरदेवांचे स्वागत करण्यात आले. मंडपात आल्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत मंत्रोच्चारात २३ जोडप्यांचा विधिवत विवाह सोहळा पार पडला. यानंतर मंचावर मान्यवरांनी येऊन दीपप्रज्वलन करीत देवतांसह समाजातील मान्यवरांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला.

यावेळी ॲड. संजय राणे यांना नुकताच परदेशात उच्चस्तरीय सन्मान देऊन गौरव करण्यात आल्याबद्दल समाजातर्फे नागरी सत्कार करण्यात आला. आ. राजूमामा भोळे म्हणाले की, प्रत्येक समाजात विवाह सोहळ्यातील वाढत्या अनिष्ठ रूढी आणि पैशांचा व वेळेचा अपव्यय बघता समाजमंडळांनी अशा सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे काळाची गरज बनली आहे. यातून गरीब परिवारातील उपवर मुलामुलींचे विवाह अल्प खर्चात पार पडतात. यामुळे वेळ आणि खर्चाची बचत होते, असेही आ. भोळे म्हणाले.

सामूहिक विवाह संमेलनातून सामाजिक हित साधले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना मदत आणि आधार देण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. समाजातील साधनसंपन्न व्यक्तींनीही आपल्या कुटुंबातील मुलामुलींच्या विवाहासाठी अशा संमेलनांमध्ये पुढे यावे, असे आवाहन यावेळी कुटुंबनायक ललित रमेश पाटील यांनी केले. या प्रसंगी सर्व वधु – वरांना संसारासाठी लागणारे आंदण (भांडी) व इतर गृहपयोगी वस्तु देण्यात आल्या.

प्रास्ताविक ॲड. संजय राणे यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती भोळे, आणि वैशाली झोपे यांनी केले. आभार ॲड. प्रकाश पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here