साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
पोलीस पाटील हे ग्रामीण भागातील जनता व पोलीस प्रशासन यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून काम करतात. कोविड काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गावाच्या रक्षणासाठी त्यांनी काम केले आहे. मात्र, त्यांना मिळणाऱ्या ६ हजार ५०० रुपये मानधन अतिशय तुटपुंजे असल्याने राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. यासाठी पोलीस पाटील संघटनांच्यावतीने चाळीसगाव मतदारसंघाचे आ.मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. यासाठी अधिवेशनादरम्यान मोर्चे काढण्यात आले. अनेक शासकीय स्तरावर बैठका घेण्यात आल्या.अखेर आ.मंगेश चव्हाण आणि पोलीस पाटील संघटनांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पोलीस पाटील यांचे मानधन ६ हजार ५०० वरून थेट १५ हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चाळीसगाव येथे गेल्या ७ मार्च रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला ना.गिरीष महाजन आले होते. तेव्हा तालुक्यातील पोलीस पाटील यांनी त्यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे तुमच्या विषयाबाबत अतिशय सकारात्मक आहे. येत्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय होणार असल्याचे आश्वासन दिले होते. अखेर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मानधनवाढीचा निर्णय झाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी आपला शब्द पाळला आहे. त्याबद्दल सर्व पोलीस पाटील संघटनांच्यावतीने त्यांचे आणि यासाठी पाठपुरावा करणारे आ.मंगेश चव्हाण यांचे आभार मानले आहेत.
भाजपा महायुती सरकारने न्याय दिला : आ.मंगेश चव्हाण
मागील काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१९ मध्ये पोलीस पाटील यांचे मानधन तीन हजारावरून दुप्पट ६ हजार ५०० रुपये केले होते. मात्र, नंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने कुठल्याही मागण्या पूर्ण केल्या नाहीत, ही वस्तुस्थिती होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच पोलीस पाटील वर्गाला न्याय देऊ शकतात याचा मला विश्वास होता. आज अखेर भरघोस अशी मानधनवाढ करण्याचा मंत्री मंडळ बैठकीत निर्णय झाल्याने ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या एका जबाबदार घटकाला भाजपा महायुती सरकारने न्याय दिला असल्याची प्रतिक्रिया आ.मंगेश चव्हाण यांनी दिली.