साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
शहराच्या सुरक्षितेसाठी दीड कोटी रुपये किंमतीचे सीसीटीव्ही कॅमेरे प्रकल्पासाठी शासनस्तरावर पाठपुरवठा करुन लवकरच चाळीसगाव शहरात आधुनिक प्रणालीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. तसेच ग्रामीण भागातील गावासाठी १५० सीसीटीव्ही कॅमेरे देणार असल्याचे आ.मंगेश चव्हाण यांनी सांगितले. भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार होते.
नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या ” एक कॅमेरा पोलिसांसाठी ” या संकल्पनेतून तसेच चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा.पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहरातील सितामाई नगर, वीर सावरकरनगरमधील रहिवाशांनी लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे कॉलनी परिसरात लावून कॉलनी परिसर सुरक्षित केला. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सीसीटीव्ही कॅमेरांचे उद्घाटन पार पडले.
सर्व मान्यवरांच्या हस्ते तसेच माजी केंद्रीय मंत्री एम.के.आण्णा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वाघडु गावातील लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने त्याचा लोकार्पण सोहळा वाघडु गावातील टेक्निकल शाळेत पार पडला. वाघडु गावातील लोकांनी सुरक्षेसाठी स्व:ताहुन उचलेले पाऊल हे पूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी आदर्श असल्याचे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी सांगुन जळगाव जिल्ह्यातील ” सर्वात सुरक्षित प्रथम गाव” होण्याचा मान मिळविला, असे सांगुन जिल्ह्यातील इतर खेडेगावाना सुध्दा उपक्रम राबविण्याकामी भर देण्यात येईल, असे सांगितले. तसेच गावातील नागरिकांचे व्यक्त करुन इतर चाळीसगाव शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनीही स्वत:चे सुरक्षितेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, असा मानस व्यक्त केला.
निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक
कार्यक्रमात चाळीसगाव शहर पो.स्टे.च्यावतीने वाघडु गावातील विद्यार्थ्यांसाठी “माझे स्वप्न” या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक तसेच प्रशस्तीपत्रक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यशस्वीतेसाठी वाघडु गावातील रहिवाश्यांनी परिश्रम घेतले.