जळगावात १२ केंद्रांवर ४,७१६ विद्यार्थ्यांची नीट फेरपरीक्षा; दुपारी १.३० नंतर ‘नो एन्ट्री’!
जळगाव
देशभरात गाजलेल्या नीट (NEET) परीक्षेतील गैरप्रकारानंतर रद्द झालेली परीक्षा आज पुन्हा होत आहे. जळगाव जिल्ह्यातील १२ केंद्रांवर एकूण ४,७१६ विद्यार्थी ही फेरपरीक्षा देत आहेत. आधीच्या पेपरफुटी आणि गोंधळामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, पुन्हा परीक्षेला सामोरे जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांवर मोठा मानसिक ताण आहे. या पार्श्वभूमीवर आजची परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून परीक्षा केंद्रांवर ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
१.३० नंतर मुख्य गेट होणार बंद!
प्रशासनाने वेळेबाबत कमालीची कडक पावले उचलली आहेत. विद्यार्थ्यांना दुपारी १:३० वाजेपर्यंतच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाईल. त्यानंतर एका मिनिटाचाही उशीर झाल्यास कोणत्याही सबबीवर प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून केंद्रावर पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तपासणीचा ‘अति’ कडक पहारा
आधीच्या गैरप्रकारातून धडा घेत प्रशासनाने सुरक्षेमध्ये कोणतीही कसर सोडलेली नाही. प्रत्येक परीक्षा केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक आणि कसून मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी केल्यानंतरच त्यांना आत सोडले जात आहे.
जळगाव जिल्ह्यात राज्याच्या इतर भागांतूनही शेकडो विद्यार्थी परीक्षेसाठी आले आहेत. या विद्यार्थ्यांना केंद्राचा पत्ता शोधण्यात अडचण येऊ नये, म्हणून रेल्वे स्थानक आणि मध्यवर्ती बसस्थानकावर विशेष ‘मदत केंद्रे’ (Help Desks) उभारण्यात आली आहेत. तेथून विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचवण्यासाठी स्थानिक पातळीवर वाहतुकीची विशेष सोय करण्यात आली आहे.
पालकांचा संतप्त सवाल: ‘आमच्या मुलांचा गुन्हा काय?’
”आधी रात्रंदिवस अभ्यास करून पेपर दिला, त्यात भ्रष्टाचार झाला. आता पुन्हा याच कडक उन्हात आणि मानसिक तणावात मुले परीक्षेला बसत आहेत. प्रशासनाच्या चुकीची शिक्षा आमच्या निष्पाप मुलांना का? आजतरी परीक्षा पारदर्शक होईल का?”
— एक संतप्त पालक, जळगाव.
जळगाव जिल्ह्यातील परीक्षेचे ‘रिपोर्ट कार्ड’
