विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेतील सूर

0
2

भुसावळ ः प्रतिनिधी
जीवनात मनुष्याच्या आर्थिक, शारीरिक, मानसिक स्थितीचा जवळचा संबंध असतो. हाच विचार डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी रोजगाराभिमुख अभ्यासक्रम तयार करायला हवा. गतिमान कालचक्राचा वेध घेऊन बदल अपेक्षित आहे, असा सूर विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेतून निघाला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातून भुसावळच्या कोटेचा महिला महाविद्यालयात अर्थशास्त्र, व्यावसायिक अर्थशास्त्र आणि बँकिंग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा घेण्यात आली.त्यात तज्ज्ञांनी आपली मते मांडली.

कार्यशाळेचे उद्घाटन भुसावळ कला, विज्ञान आणि पी. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मीनाक्षी वायकोळे यांच्याहस्ते सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. मोहन पावरा, व्यावसायिक अर्थशास्त्र व बँकींग अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा. ए. डी. गोस्वामी यांची उपस्थिती लाभली.

कार्यशाळेच्या समन्वयिका प्रा. नीता चोरडिया यांनी अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांना समजणारा, आकलन होणारा, वेगळा विचार देणारा आणि काळानुसार बदलता पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन व्यावसायिक अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. शरद अग्रवाल यांनी केले. प्रास्ताविक नीता चोरडिया, आभार प्रा. कीर्ती म्हस्के यांनी मानले.

अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेत प्रथम सत्रात एफ.वाय.बी.कॉम. व्यावसायिक अर्थशास्त्र बँकिंग या विषयाच्या सुधारित अभ्यासक्रमावर अभ्यासपूर्ण अशी चर्चा करण्यात आली. प्रा. डॉ. जितेंद्र तलवारे, प्रा. डॉ. सर्जेराव गोल्डे, प्रा. डॉ. राजेंद्र ठाकरे, प्रा. डॉ. साळुंके, प्रा. डॉ. पगारे, प्रा. डॉ. वराडे यांनी चर्चेत सहभाग घेतला. प्रत्येकाने वेगळा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यशाळेत विद्यापीठाच्या परिक्षेत्रात येणाऱ्या महाविद्यालयांचे अर्थशास्त्र, व्यावसायिक अर्थशास्त्र बँकिंग या विषयाचे प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यशाळेत कोण काय म्हणाले?

डॉ. मीनाक्षी वायकोळे : अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देणारा आणि बदलत्या काळाशी अनुरूप असावा. जगभरातील आर्थिक घडामोडींचा चिकित्सक असा अभ्यास करून कालसापेक्ष असे विषय त्यात समाविष्ट होणे अपेक्षित आहे.
प्रा. डॉ. ए. डी. गोस्वामी : बदलत्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीचा अचूक वेध घेऊन अभ्यासक्रमात बदल केला जाईल. कार्यशाळेत केलेल्या सूचना, मांडलेले मुद्दे हे पथदर्शी आहेत. विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रमावर भर देण्याचा प्रयत्न असेल.
प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा : जागतिक पातळीवरचे अर्थशास्त्र, वर्तमानातील घडामोडी, रोजगाराची उपलब्धता हे विषयही अभ्यासक्रम तयार करताना लक्षात घेतले पाहिजे. बदलत्या आंतररराष्ट्रीय परिस्थितीचाही विचार चिकित्सकपणे करणे अपेक्षित आहे. सामान्य ज्ञानाचाही त्यात विचार करावा.
प्रमाणपत्रांचे केले वाटप
द्वितीय सत्रात उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. धनवीज यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेचा समारोप झाला. सहभागी प्राध्यापकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. संस्थाध्यक्षा पद्मा कोटेचा, सचिव संजय सुराणा व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. विद्यापीठ वाणिज्य व व्यस्थापन मंडळाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. पी. पी. छाजेड, प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा, उपप्राचार्य प्रा. वाय. डी. देसले, प्रा. डॉ. जे. व्ही. धनवीज यांचे मार्गदर्शन लाभले. व्यावसायिक अर्थशास्त्र प्रमुख डॉ. शरद अग्रवाल, प्रा. कीर्ती म्हस्के. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here