रोटरी – मसाप तर्फे राजभाषा दिनानिमित्त कुसुमाग्रजांना अभिवादन

0
4

चोपडा : प्रतिनीधी
‘जाता जाता गाईन मी गाता गाता जाईन मी, गेल्यावरही या गगनातील गीतांमधून राहीन मी …. माझे जगणे होते गाणे’ ही जगण्यातली सार्थकता स्पष्ट करणारी कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांची रचना मराठी मनाला आनंद देऊन जाते. तोच आनंद उपस्थित श्रोत्यांना मिळाला …. शब्द सूर मैफलीच्या निमित्ताने!
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा – चोपडा व रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त व ज्येष्ठ गायिका शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्त ‘सुश्राव्य शब्द-सूर मैफल’ आयोजित करण्यात आली होती. या संगीत मैफलीचा आरंभ शिवरंजनी संगीत विद्यालयाचे मनोज चित्रकथी व विवेक बाविस्कर यांनी नांदी जाऊन केला. मनोज चित्रकथी यांनी भूपाळी तसेच ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके लिखित मनाच्या धुंदीत लहरीत ये ना…., वल्लव रे नाखवा…, शुर आम्ही सरदार…, मागे उभा मंगेश… ही विविध ढंगातील बाजारातील गाणी सादर करत रंग भरला तर डॉ. हेमंत पाटील यांनी ‘नको देवराया अंत असा पाहू…’ हे भक्तीगीत व शांता शेळके लिखित ‘ही चाल तुरु तुरु …’ हे उडत्या चालीचे गीत सादर केले. विवेक बाविस्कर यांनी ‘नारायणा रमा रमणा …’ हे नाट्यगीत व ‘अनंता तुला कोण पाहू शके….’ ही आर्त प्रार्थना अतिशय प्रभावीपणे सादर केली. योगेश चौधरी यांची ‘राधे तुला …’ ही गवळण उपस्थितांना भावली. मैफलीची सांगता कुसुमाग्रजांच्या ‘सर्वात्मका सर्वेश्वरा…’ या गीताने मनोज चित्रकथी यांनी केली. विजय पालीवाल व नरेंद्र भावे यांनी तबल्यावर तर दुर्गेश चौधरी यांनी ढोलकीवर साथसंगत केली. बी. यु. जाधव यांच्या बासरीच्या सुरावटीने मैफलीत रंग भरला. विवेक बाविस्कर (सिंथेसायझर), निलेश कुंभार (तालवाद्य) यांनी साथ संगत केली मैफलीचे निवेदक म्हणून योगेश चौधरी यांनी गुंफण केली.
शहरातील पंकज विद्यालयात झालेल्या या मैफलीच्या प्रारंभी मसापचे शाखाध्यक्ष कविवर्य अशोक नी. सोनवणे, उपाध्यक्ष प्राचार्य राजेंद्र महाजन, कार्याध्यक्ष विलास पं. पाटील, रोटरी क्लबचे प्रेसिडेंट पंकज बोरोले, सेक्रेटरी प्रवीण मिस्त्री, एनक्लेव चेअर एम. डब्ल्यू. पाटील, प्रोजेक्ट चेअरमन रमेश वाघजाळे, डॉ. विकास हरताळकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन व माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मसापचे प्रमुख कार्यवाह संजय बारी यांनी, प्रास्ताविक विलास पं. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन सेक्रेटरी प्रवीण मिस्त्री यांनी केले. या संगीत मैफलीस मोठ्या संख्येने श्रोतृवृंद उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here