इंदूर, वृत्तसंस्था । इंदूरमधील जावेद हबीबने चालवलेले सर्व सलून ४८ तासांच्या आत बंद करावेत, असा इशारा भाजप नेते आणि इंदूरचे आमदार आकाश विजयवर्गीय यांनी शुक्रवारी दिला. हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील एका क्लिपमुळे अडचणीत सापडला आहे ज्यामध्ये तो कार्यशाळेत महिलेच्या केसांवर थुंकताना दिसत आहे.
शहरातील सर्व जावेद हबीब सलून बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विजयवर्गीय यांनी दिला आहे. इंदूरमधील जावेद हबीबची सर्व सलून आणि केंद्रे बंद करण्याची मागणी या भाजपा नेत्याने ट्विटरवर केली. “हा व्हिडिओ शहरातील सर्व जबाबदार प्रशासकीय अधिकार्यांसाठी आहे, ज्यात जिल्हाधिकारी, आयुक्त, पोलिस आयुक्त आणि इतरांचा समावेश आहे. अलीकडेच आम्ही एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांनी पूजा गुप्ता या महिलेला स्टेजवर आमंत्रित केले आणि स्टाइल करताना तिच्या केसांवर थुंकले. मी या कृत्याला तीव्र विरोध करतो आणि तुम्हा सर्वांना विनंती करतो की किमान इंदूरमध्ये ४८ तासांच्या आत जावेद हबीबची सर्व सलून बंद करावीत,” असं विजयवर्गीय यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
विजयवर्गीय पुढे म्हणाले की, त्यांनी मध्य प्रदेशातील सर्वात मोठ्या शहरात जावेद हबीब यांना कोणतेही सलून चालवू न देण्याचा निश्चय केला आहे. “मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना विनंती करतो की येत्या दोन दिवसांत इंदूरमधील त्यांचे सर्व सलून बंद करा,” असे आकाश विजयवर्गीय म्हणाले. योगायोगाने जावेद हबीब हे देखील भाजपचे नेते आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान एप्रिल २०१९ मध्ये त्यांनी पक्षात प्रवेश केला.