‘फक्त चहा’;  चोखंदळ रसिकांसाठी ठरला ताजा-तजेलदार

0
3

राज्य नाट्य स्पर्धा
जळगाव : हेमंत काळुंखे

केंद्रावरील राज्य मराठी हौशी नाट्यस्पर्धेचा समारोप काल झाला.जळगावच्या युवा ब्रिगिडीअर्स बहुउद्देशिय फाऊंडेशनने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत तरुणींच्या जोडीदार निवडीच्या विषयावर प्रकाशझोत टाकणारे ‘फक्त चहा’ हे नाटक सादर करुन लेखक व दिग्दर्शक आकाश बाविस्कर व त्यांच्या टीमने अपेक्षित उंची गाठण्याचा जो प्रयत्न केला तो निश्‍चितच कौतुकास्पद व अभिनंदनीय.
प्रत्येक मुलीच्या आई-वडिलांचे एकच स्वप्न असते की तिला तिचा जोडीदार सुयोग्य मिळावा. तिचे वय, शिक्षण पूर्ण झालं की तिने लवकर लग्न करणे. मात्र, आजच्या आधुनिक मुलींची इच्छा ही त्यांच्या शिक्षणाचा उपयोग स्वावलंबी बनण्यात आणि तिच्या विचारांशी जुळणाऱ्या मुलाशी लग्न करण्यात असते. प्रतीक्षा ही स्वतःवर प्रेम करणारी, स्वतःच्या विश्वात रमणारी कविमनाची मुलगी आहे. तिचा स्वतंत्र आयुष्य जगण्याची वेगळी चौकट आहे. जुनाट रूढी- परंपरांना फाटा देत,जोडीदार निवडण्याचा संबंध ‘फक्त चहा’ पुरता मर्यादित न राहता,दोघांंच्या मनात जोडीदाराबद्दल असलेल्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात व मुलींना त्यासंदर्भात स्वातंत्र मिळावे,असा आग्रह या नाटकातून धरण्यात आला.

प्रेक्षकांची मने जिंकली
विषयाचे गांभीर्य आणि त्याचे सादरीकरण करताना दिग्दर्शक आकाश बाविस्कर यांनी बरीच मेहनत घेतली असली तरी काही बाजूंनी आणखी परिश्रम घेतले असते तर ‘फक्त चहा’ आणखी तजेलदार झाला असता.बाबांची भूमिका त्यांनी स्वतः समर्थपणे पेलली.प्रतीक्षाच्या भूमिकेत गायत्री ठाकूरने विशेष छाप टाकली.चोख पाठांतर, स्पष्ट उच्चार,प्रभावी संवादफेक व सहज सुंदर अभिनय प्रेक्षकांची मने काबीज करुन गेला.कल्याणी जगताप हिने सफिना या मुस्लिम तरुणीच्या भूमिकेस योग्य न्याय देतांना लव्ह जिहादसारख्या प्रश्‍नालाही वाचा फोडली.सुमीच्या भूमिकेत निशा पाटील ठिकठाक.प्रतीक्षा झांबरे यांनी आईच्या भूमिकेत उत्तम ठसा उमटविला.याशिवाय नितेश सिसोदिया, निलेश भोई, मयूर अहिरराव यांनी आपल्या वाटेला आलेल्या भूमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. पत्रकार रविच्या भूमिकेवर सागर सोनवणे यांनी आणखी मेहनत घेणे आवश्‍यक वाटते.
तंत्र कालवंतांची कामगिरी चोख
लेखक व दिग्दर्शक आकाश बाविस्कर यांनी तंत्रज्ञ कलावंतांकडून चोख कामगिरी करून घेतल्याचे जाणवले. नाटकाच्या नेपथ्यावर कुणाल विसपुते यांनी मेहनत घेतल्याचे जाणवले.रंगमंच व्यवस्था विकी कोळी, हितेश कोळी, ओम बोंडे, टिळक महाजन व उज्ज्वल पवार यांनी चोख सांभाळली.यश चौधरी यांची प्रकाश योजना प्रभावी वाटली.मयूरा ठाकूर आणि स्वाती सकट यांची रंगभूषा व वेशभूषाही विषयाला साजेशी. हितेश सावळे यांचे पार्श्वसंगीत हे प्रसंगाना उठाव देणारे ठरले व चित्रपटातील जुन्या गाण्यांचा उपयोग मोठ्या खुबीने करुन घेण्यात आला आहे.एका चांगल्या नाटकाने स्पर्धेचा समारोप केल्याबद्दल निर्मिती प्रमुख ललित कोल्हे व सागर बोरोले यांच्यासह लेखक-दिग्दर्शक आकाश बाविस्कर यांच्या सर्व टीमला धन्यवाद.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here