औरंगाबादः प्रतिनिधी
मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या जालना ते जळगाव रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्व्हेला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी साडे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जालना ते जळगाव हा 174 किलोमीटर लांबीचा मार्ग असून त्याच्या सर्वेक्षणाचे काम सुरु झाले आहे. हे सर्वेक्षण 23 ते 25 मार्च या कालावधीत होणार असून त्यासाठी रेल्वे विभागाचे अधिकारी जालन्यात दाखल झाले आहेत. विभागाचे हे अधिकारी जालना ते जळगाव मार्गावरील विविध गावांना भेटी देणार आहेत. त्यानंतर रेल्वेमार्गासंबंधीचा अहवाल रेल्वे विभागाकडे दिला जाईल. हा रेल्वे मार्ग झाल्यानंतर मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील औद्योगिक विकासासह, व्यापार, दळणवळण, शेती, लघुउद्योग आणि पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.
तीन सदस्यांचं पथक दाखल
मुंबई येथील मुख्य परिचलन अधिकारी व्ही. नलीन, मुख्य दळणवळण अधिकारी रविप्रकाश गुजराल व मुकेश लाल या तीन सदस्यांची टीम जालना-जळगाव रेल्वे मार्गाचे अंतिम सर्वेक्षण करणार आहे. यात अधिकारी जालना, राजूर गणपती, तहसील कार्यालय भोकरदन, सिल्लोड, अजिंठा व जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी भेटी देणार आहेत.