जळगाव : प्रतिनिधी
‘रिॲलिटी शो’च्या माध्यमातून तनय मल्हारा, शिवम वानखेडे यांनी जळगाव शहराचे नाव उंचावलेले आहे. आता जळगाव शहरातील तन्वी मल्हाराने मालिकेच्या दुनियेत पाऊल ठेवून लक्ष वेधले आहे. टीव्हीवर लवकरच सुरू होणाऱ्या ‘मुस्कुराने की वजह तुम हो’ या मालिकेत ती मुख्य अभिनेत्रीचे पात्र साकारणार आहे. कलाकार कुणाल जयसिंग सोबत या मालिकेत ती मुख्य भूमिकेत असेल.
जळगावातील मल्हार हेल्प केअरचे आनंद मल्हारा यांची सुकन्या तन्वीने देखील मॉडेलिंगपासून आपल्या करिअरला सुरवात केली. तिची टीव्हीवरील ‘मुस्कुराने की वजह तुम हो’ या मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी निवड झाली. तन्वीची ही पहिली मालिका असून इतर कथांपेक्षा वेगळी कथा या मालिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. अनोखी प्रेमकथा त्यात दाखवण्यात येणार आहे.
तन्वी या मालिकेत एका आशावादी मुलीची भूमिका साकारणार आहे. ती एका एनजीओसाठी काम करत असते. अविवाहित असताना गर्भवती राहिल्यानंतर एकटीच बाळाला वाढवण्याचा निर्णय घेते. समाजातील सर्व घटकांना ती जिद्दीने तोंड देते. ती अशा व्यक्तीच्या शोधात असते जो तिला आहे त्या अव्यवस्थेत सांभाळण्यास तयार होईल. या वेळी तिला कबीर अर्थात कुणाल जयसिंग भेटतो. जो एक व्यावसायिक दाखवलेला आहे. तो तिला भेटतो. तिच्या खरेपणावर प्रभावित होतो आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार होतो अशी प्रेमाची सुरुवात या मालिकेत दाखवण्यात येणार आहे.
या कथेतून मिळेल प्रेरणा
‘मुस्कुराने की वजह तुम हो’ ही एक वेगळी कथा आहे. ही भूमिका साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. हे पात्र साकारताना त्यातून नक्कीच मुलींना प्रेरणा मिळेल असा विश्वास आहे.
– तन्वी मल्हारा, अभिनेत्री