तालुक्यात खरीप पेरणी साठी शेतकरी राजा सज्ज झाला असून पेरणी पूर्व मशागतीला वेग आला आहे. खरीपाच्या पेरणीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून रख रखत्या उन्हात म्हणजे 44 डीग्री च्या वर असलेल्या तापमानात सुध्दा शेतकरी राजा आपल्या शेतात राबतांना दिसून येत आहे. नांगरणी व रोटा व्हीटर करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. इंधन दर वाढी मुळे नांगरणी व रोटा व्हीटर चे दर वाढले असून गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी एकरी तीनशे ते चारशे रुपये वाढलेले आहेत. त्यामुळे इंधन दरवाढीचा फटका सर्वच क्षेत्राला बसणार आहे.
गेल्या वर्षी झालेल्या अती पाऊसामुळे शेतकऱ्यांना खरीपाच्या हंगामात आतोनात नुकसान सोसावे लागले होते. मात्र जमिनीत पाण्याचा मुबलक साठा झाल्याने खरीपाचे झालेले नुकसान व विजवितरण कंपन्यांचे आडमुठ्ठे धोरण यामुळे विजेचा झालेला लपंडाव यावर मात करीत रब्बीचे काही प्रमाणात पीक हाती आल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. रब्बीचे पिक शेतात उभे असल्याने व कोरोनामुळे दोन वर्षांपासून थांबलेली मुला मुलींची लग्न या लगीन घाईत खरिपाची पेरणी करण्यासाठी पूर्व मशागतीला थोडा उशीर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे घाई घाईत आपली शेतातील राहिलेली कामे उरकतांना शेतकरी राजा दिसून येत आहे. त्यात मान्सून 6 जून लाच महाराष्ट्रात धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असल्याने शेतकऱ्यांना रात्रंदिवस शेतात थांबून पेरणी पूर्व मशागत करावी लागत आहे.
काही शेतकऱ्यांचे ठिंबक सिंचन चे प्रकरणे अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत थांबलेली असून कृषी विभागाची व ठिंबक सिंचन विक्रित्यांची उंबरठे शेतकऱ्यांना झिजवावे लागत आहेत. तर काही शेतकऱ्यांचे ठिंबक सिंचन चे अनुदान अजूनही शेतकऱ्यांना प्राप्त झालेले नाही. तरीही बळीराजा खाजगी सावकारांसह महिला बचत गट, फायनान्स कंपन्या, खाजगी पतसंस्था, बँक यांच्या कडून आव्वाच्या सव्वा व्याजाचे कर्ज काढून आपली जरुरत पूर्ण करतांना दिसून येत आहे. त्यातच कधी नव्हे इतकी महागाई यावर्षी वाढलेली असून खाद्यांनाच्या किंमती गगनाला भिडलेल्या असून गॅस आणि इंधन दरवाढ झाल्याने महागाईचे आगीत तेल ओतल्या गेले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना खरीपाच्या पेरणीसाठी लागणारे बी बिजवाई, कीटक नाशक, रासायनिक खते यांच्या किंमती सुध्दा वाढतांना दिसून येत आहेत. शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला (कापसाला) यावर्षी चांगला भाव मिळाला खरा मात्र उत्पन्नात घट व वाढती महागाई यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या ओझ्याखली दाबला जाणार हेही तेवढेच खरे. केंद्र व राज्य सरकारच्या आपसी भांडणात शेतकरी राजा मात्र भरडला जात असून शेतकरी हिताचा निर्णय घेतला जाईल का? का शेतकरी पुन्हा उपेक्षितच राहील. याकडे शेतकरी राजा आस लाऊन पाहत आहे.