जळगाव / प्रतिनिधी
अमरावती येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात एम.ए.चे शिक्षण घेत असतांना सामाजिक कार्यात सक्रीय सहभागी होत आपल्या समाज कार्याचा श्रीगणेशा केलेले रामसाहेब चव्हाण यांनी अनेक चळवळीत सहभागी होऊन आपल्या आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देत कधीच मागे फिरुन पाहिले नाही.
आदिवासी विद्यार्थी संघाचे सहसचिव म्हणून सामाजिक कार्याची जबाबदारी स्विकारलेले रामसाहेब चव्हाण एम.ए.एम.एस.डब्लूचे उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर एम.पी.एस.सी ची परीक्षा उत्तीर्ण करून प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर सुध्दा सामाजिक कार्यापासून स्वतः ला अलिप्त ठेवल्याचे दिसून आले नाही एवढेच नव्हे तर आदिवासी विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवतांना त्यांना शासकीय नोकरी गमावण्याची वेळ सुध्दा आली होती.
आपल्या कुटुंबाची व नोकरी ची तमा न बाळगता समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाज बुलंद करणारे माझे स्नेही रामसाहेब चव्हाण हे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्लीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावर विराजमान झाले. रामसाहेबांची या पदावर झालेली निवड म्हणजे त्यांच्या सामाजिक कार्याचा बहुमान आहे.विद्यार्थी जीवनापासून त्यांच्या कडून होत असलेल्या सामाजिक कार्याचा गौरव आहे.आमच्या साठी हे भूषणावह आहे.पारधी समाजासाठीही ते सातत्याने आवाज उठवत आले.आदिवासी पारधी समाजासाठी स्वतंत्र पारधी पॅकेज जाहिर करावा यासाठी तत्कालिन गृहमंत्री आर.आर.आबा यांचे कडे पाठपुरावा करुन पारधी पॅकेज पदरात पाडूनही घेतले तसेच पारधी विकास परिषदेचीही स्थापना करुन समाजाला मुळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आता त्यांच्या वर आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.ती जबाबदारी ते नक्कीच पार पाडतील व आदिवासी समाजाला न्याय मिळवून देतीलच.
त्यांच्या हातून समाजोन्नीतीचे कार्य घडत राहणार आहेच. याचसाठी त्यांचेवर आलेली ही फार मोठी जबाबदारी आहे.त्यांच्या या निवडीबद्दल पारधी समाज सुधार समितीचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ माळी यांनी स्वागत केले आहे.