आत्महत्येपूर्वी इन्स्टाग्रामवर ठेवलेला ‘शेवटचा संदेश’ उघडकीस
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी
जळगाव शहरातील शासकीय वसतिगृहातून मंगळवारी १८ वर्षीय रोहित समाधान पवार या तरुणाने आत्महत्या केली, ज्यामुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पवार हा धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथील रहिवासी असून जळगाव येथील शासकीय आयटीआयमध्ये शिक्षण घेत होता. मंगळवारी १७ मार्च रोजी सकाळी त्याचे वडील समाधान पवार व काका त्याला भेटण्यासाठी वसतिगृहात आले. रोहितने वडिलांना सांगितले की “पोटात दुखत असल्यामुळे आज कॉलेजला जाऊ शकत नाही.” वडील परतल्यानंतर काही तासांतच दुर्दैवी घटना घडली.
दुपारी सुमारे ३ वाजता रोहितचा रूममेट सागर शिरोळ कॉलेजवरून परतल्यावर त्याने खोलीत रोहितला गळफास घेतलेले पाहिले. तत्काळ त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासाअंती त्याला मृत घोषित केले.
इन्स्टाग्राम स्टेटसने उभा केला गूढ
रोहितने आत्महत्येपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक गूढ संदेश ठेवला होता. त्यात लिहिले होते:“इन्स्टाग्राम अकाउंटला समस्या येत असल्याने आजपासून अकाउंट बंद करत आहे. कोणीही मेसेज करू नये, कोणाला काही वाईट मेसेज गेले असतील तर माफ करा.”
हा स्टेटस पाहून त्याच्या मित्रपरिवारात आणि शाळा-आयटीआयमध्ये मोठा खळबळ उडाली आहे. रोहितच्या वडिलांनीही यावर संशय व्यक्त केला असून या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सध्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.या घटनेमुळे तरुणांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढविण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
