छाजेड ऑईल मिलजवळ पोलीस कारवाई; भारतीय हत्यार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :
शहरातील छाजेड ऑईल मिलच्या पाठीमागे पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने रविवारी पहाटे १९ वर्षीय तरुण मयुर राजु मोरे याला गावठी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत राऊंडसह रंगेहात पकडण्यात यश मिळवले. ही कारवाई पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीस शिपाई रविंद्र निंबा बच्छे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ११ ऑक्टोबर रोजी रात्री ११.२५ वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक मनेळ, उपनिरीक्षक गणेश सायकर तसेच पोलीस कर्मचारी निलेश पाटील, ज्ञानेश्वर पाटोळ, नरेंद्र चौधरी, कल्पेश पगारे, केतन सुर्यवंशी, राकेश महाजन आणि पंचांच्या उपस्थितीत कोबींग ऑपरेशनसाठी रवाना झाले होते.
त्यानंतर दि. १२ ऑक्टोबर रोजी पहाटे २.२० वाजता गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मयुर मोरे छाजेड ऑईल मिलच्या पाठिमागे घाटरोड ते हुडको त्रिमूर्ती बेकरी मार्गावर गावठी कट्टा घेऊन येत आहे. माहिती मिळताच पोलीस पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला.
थोड्याच वेळात संशयास्पद हालचाल करणारा युवक दिसल्यावर पोलीसांनी त्याला वेढा घातला. पंचांसमक्ष चौकशी केली असता त्याने आपले नाव मयुर राजू मोरे (वय १९, रा.प्रभात गल्ली, चाळीसगाव) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतल्यावर कमरेच्या उजव्या बाजूस लपवलेले गावठी बनावटीचे पिस्तुल (किंमत ₹30,000) आणि खिशात दोन जीवंत राऊंड (किंमत ₹2,000) असे एकूण ₹32,000 किंमतीचे शस्त्र मिळाले. त्याच्याकडे शस्त्राचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचेही उघड झाले.
पोलिसांनी सर्व मुद्देमाल पंचनामा करून ताब्यात घेतला असून आरोपी मयुर मोरे याला पुढील चौकशीसाठी पोलिस स्टेशनला आणण्यात आले आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांनी भारतीय हत्यार प्रतिबंध अधिनियम 1959 चे कलम 3 व 25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 नुसार गुन्हा दाखल केला आहे.पोलिस निरीक्षकअमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश सायकर व गुन्हे शोध पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली आहे. या कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये शस्त्राच्या तस्करीविरोधात पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत समाधानाची भावना निर्माण झाली आहे.