वेळेवर लागणारे लग्न लागतेय उशिरा
तुळशीचे लग्न झाले आणि लग्नाचा बार उडाला. परंतु, आधुनिकतेच्या नावावर दिवसेंदिवस विवाह सोहळ्यांचे स्वरूप बदलत चालले आहे. त्यामुळे सामाजिक अभिसरण बिघडत आहे. वेळेवर विवाह पार पडत नाही, मग मुहूर्त काढतातच कशाला, असा प्रश्न वऱ्हाडी मंडळींकडून उपस्थित केला जातो आहे.
विवाह समारंभात येणाऱ्या बँड, बाजा आणि डी.जे. मुळे विवाह सोहळे उशिरा पार पडत आहेत. विवाह सोहळा म्हणजे दोन कुटुंबाचा एकत्र येण्याचा एक शुभ क्षण होय. त्यामुळे लग्नकार्यात नातेवाईक, आप्तस्वकीय, मित्रांसह अनेक जण एकत्र येतात. हल्लीच्या लग्न सोहळ्यात लावण्यात येणारे डी. जे. ऑक्रेस्ट्रा यांचा गोंधळ वाढत चालला आहे. परिणामी लग्न विधीला कमालीचा विलंब होत असल्याने वेळेवर लागणारे लग्न उशिरा लागत आहेत, त्यामुळे जेवणावळीच्या टेबलांवर रांगा आणि अन्नाची नासाडी बघायला मिळत आहे.
आधी प्रत्येक विवाह समारंभात वेळेचे भान ठेवले जायचे, चौघड्यांच्या मधुर संगीतात लग्न लागायचे. सोहळ्यातील अनावश्यक खर्च टाळला जात असे. आता वरातीत नाचण्याचा अट्टाहासापाई वेळेचे भान न ठेवता नातेवाईक मित्रमंडळी लग्नाला उशीर लावत आहे. परिणामी तीन ते चार तास उशिरा लग्न लागत असल्याने अन्नाच्या टेबलावर रांगाच रांगा बघायला मिळत आहे. पुन्हा रांगेत नको म्हणून अनेक जण भरमसाट थाळीत अन्न घेत आहेत व खाणे होत नसल्याने फेकून देत आहे. त्यामुळे अन्नाची नासाडी होत आहे.
लग्नकार्यात नातेवाईक, आप्तस्वकीय, मित्रांसह अनेक जण एकत्र येतात. त्यावेळी भेटीगाटीमध्ये शेती, शिक्षण, राजकारण, समाजकारण एकमेकांविषयी खुशाली आदी चर्चा घडत असते. परंतु हल्ली याचा अभाव दिसत आहे. आपुलकी, प्रेम, जिव्हाळा कमी होत असल्याचे दिसत आहे.
-गजानन क्षीरसागर,लोहारा, ता. पाचोरा