साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
तालुक्यातील महालखेडा शिवारात ३५ वर्षीय महिलेला अनैतिक संबंधातून शुक्रवारी, ५ एप्रिल रोजी यमसदनी धाडून तिचा खून केला आहे. महिलेच्या डोक्यात दगड टाकून, शरीरावर गळ्यावर धारदार हत्याराने वार करत तिचा खून केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी उघडकीस आली. मालताबाई मनोज खाडे (वय ३५) असे मयत महिलेचे नाव आहे. दरम्यान, मयत महिलेच्या अल्पवयीन मुलाच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी संजय सुधाकर पाटील (रा. महालखेडा, ता. मुक्ताईनगर) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला रविवारी, ७ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे निरीक्षक मोहिते यांनी सांगितले.
सविस्तर असे की, मालताबाई सकाळी शेतात गेली होती. शुक्रवारी, ५ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या पूर्वी महालखेडा शिवारातील डाबर नाल्याजवळ महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलीस तपासात महिलेची ओळख पटली. संजय पाटीलचे मयत महिलेसोबत अनैतिक संबंध होते. मयत महिलेसोबत याच मुद्यावरून तो वादही करत होता. त्याच वादातून शुक्रवारी त्याने डोक्यात दगड टाकुन, शरीरावर, गळ्यावर धारदार हत्याराने वार करुन संबंधित महिलेचा खून केला, अशी माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते करीत आहेत.
घटनास्थळी यांनी दिली भेट
घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी आर.एस.शिंदे, पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक संदीप दूनगहू, उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, राहुल बोरकर, संदीप चेडे यांनी भेट दिली.