साईमत धुळे प्रतिनिधी
महापालिका हद्दीत मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासांतर्गत तब्बल ३१ कोटी ७३ लाख रुपयांवर खर्चाच्या कामांना महापालिकेच्या स्थायी समिती सभेने मंजुरी दिली. यात विविध प्रभागातील ३९ कामांचा समावेश आहे. याशिवाय सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवरचे खड्डे बुजविणे, रस्ते व क्रॉस ड्रेनेजची दुरुस्ती व आनुषंगिक कामांच्या विषयालाही स्थायी समितीने अखेर मंजुरी दिली.
महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा गुरुवारी सकाळी अकराला महापालिका सभागृहात झाली.सभापती किरण कुलेवार, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य, अधिकारी उपस्थित होते. मनपा हद्दीत मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासांतर्गत कामांसाठी आलेल्या निविदादरांवर चर्चा करून निर्णय घेण्याचे विषय होते. स्लॅब ड्रेन, रस्ता काँक्रिटीकरण, जॉगिंग ट्रॅक, रस्ता डांबरीकरण, संरक्षक भिंत, स्ट्रीटलाइट, पूल बांधणे, महिंदळे शिवारात स्मशानभूमी, महिंदळे येथे दहा सीटचे शौचालय, कुमारनगर अमरधाम दशक्रिया विधी शेड व बैठक व्यवस्था करणे, रस्ता खडीकरण, डांबरीकरण, भूमिगत गटार व रस्ता काँक्रिटीकरण, पाइपलाइन आदी कामांचा यात समावेश आहे. अशा ३९ कामांसाठी प्राप्त निविदांपैकी सर्वांत कमी निविदाधारकांना कामे देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली.मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासांतर्गत ३९ कामांसाठी एकूण ३१ कोटी ७३ लाख ३८ हजार ३११ रुपये खर्च होणार आहे. यातील २३ कामांचा खर्च हा जीएसटी वगळून असल्याने या खर्चात पुन्हा वाढ होणार आहे. विशेष म्हणजे ही सर्व कामे शासनाच्या १०० टक्के अनुदानातून होणार आहेत. यात महापालिकेचा हिस्सा नसल्याचेही बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.गणेशोत्सव, ईद, नवरात्रोत्सव आदी विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवरचे खड्डे बुजविण्यासदेखील स्थायी समितीने अखेर मंजुरी दिली.यापूर्वी खड्डे बुजविण्याचा विषय स्थायी समितीने दोनदा फेटाळून लावला होता. दरम्यान, ज्या रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत, असे रस्ते वगळून किंवा अशा रस्त्यांवर आजच खड्डे बुजविणे गरजेचे असल्यास ते तात्पुरत्या स्वरूपात बुजवून इतर ठिकाणच्या रस्त्यांवरचे खड्डे बुजविण्यात येणार आहेत.