केंद्र व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार, कामगारांसाठी थंडावा, पिण्याचे पाणी आणि विश्रांती क्षेत्रे सुनिश्चित करणे अनिवार्य; ग्रामयात्रा व सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही विशेष खबरदारी.
साईमत / जळगांव
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार येत्या काही महिन्यांत तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाचे श्रम व रोजगार मंत्रालय आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) यांनी उष्णतेच्या लाटेपासून कामगार आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
अत्यंत उष्णतेच्या परिस्थितीत बांधकाम कामगार, वीटभट्टी कामगार, रोजंदारी मजूर तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांना उष्माघाताचा धोका जास्त आहे. प्रशासनाने जिल्ह्यातील नियोक्ता, उद्योग, बांधकाम कंपन्या तसेच ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांना तातडीने आवश्यक उपाययोजना राबविण्याचे आवाहन केले आहे.
यात कामाचे तास पुन्हा नियोजित करणे, दुपारच्या उष्णतेत काम टाळणे, कामगारांना विश्रांती देणे, थंडावा मिळेल असे क्षेत्र तयार करणे, पुरेसे पिण्याचे पाणी आणि आपत्कालीन उष्णता प्रतिबंधक साहित्य उपलब्ध करणे यांचा समावेश आहे. तसेच आरोग्य विभागाशी समन्वय साधून नियमित आरोग्य तपासणी करण्याची सूचना दिली आहे.
याशिवाय उन्हाळ्यात आयोजित होणाऱ्या ग्रामयात्रा, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश आहेत. यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती, कार्यक्रमांचे वेळापत्रक उष्णतेच्या उच्चांकानुसार बदलणे, थंडावा मिळेल असे विश्रांती क्षेत्र उभारणे, पिण्याचे पाणी व इलेक्ट्रोलाइट पेय उपलब्ध करणे आणि जनजागृतीसाठी घोषणाबाजी, पत्रके व माहिती फलकांचा वापर करण्याचा समावेश आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वैशाली चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सर्व संबंधित विभाग, उद्योग आणि स्थानिक संस्थांना उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रभावी समन्वय साधून उपाययोजना राबवण्याचे आवाहन केले आहे.
