मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल मी चुकीचे शब्द वापले नाहीत. शिवसेनेत ज्या काही घडामोडी घडल्या त्यासंदर्भात मी भाष्य केले. ०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यानी भाजपला (BJP) बिनशर्त पाठिंबा दिल्याने शिवसेनेची ताकद कमी झाली, असे वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले होते. यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उडाली. यावर केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले.
शरद पवार महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल महाराष्ट्राला आदर आहे. त्यांच्याबद्दल एखादा शब्द निघाला असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असं दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले. आजपर्यंत पवारांच्या विरोधात कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नाही. ते मला गुरुसमान आहेत, मी त्यांच्याबद्दल एकही चुकीचा शब्द बोललो नाही, लोकांना माझ्याविरुद्ध भडकवलं जात आहे. जर चुकूनही पवार दुखावले असतील तर मी त्यांची माफी मागतो.पवारासंदर्भात मी केलेली वक्तव्य तपासून पाहा, तसे झाले असेल तर सार्वजनिक जीवनातून राजीनामा देईन, असे दीपक केसरकर म्हणाले.
जितेंद्र आव्हाड मला नारायण राणेंच्या (Narayan Rane) मुलांचा प्रचार करा हे सांगायला आले होते, ते शरद पवार यांचा निरोप घेऊन आले नव्हते मात्र ज्यावेळेस पवार सावंतवाडीला आले त्यावेळी मी माझ्या मतदारसंघात होतो. मी राणेंच्या मुलांचा प्रचार करु शकत नाही हे सांगत मी माझा राजीनामा विधानसभा अध्यक्षांच्या नावानं शरद पवार यांच्याकडे दिला होता. शरद पवार यांनी माझा राजीनामा स्वीकारला नव्हता.
शरद पवार सिंधुदुर्गात आले होते पण त्यावेळी मला स्टेजवर येऊ दिले गेले नाही. मात्र मला स्टेजवर येऊ देऊ नका, असा निरोप पवारांनी दिला नाही, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल भाजपच्या लोकांनी बोलू नये, असं मी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर बोललो होतो. किरीट सोमय्या देखील आता ठाकरेंबाबत जास्त बोलत नाहीत. निलेश राणे यांनी माझ्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल प्रेम असेल तर केसरकर यांनी मातोश्रीवर भांडी घासायला जावे,असे राणे म्हणाले. सिंधुदुर्गातील एकाही शिवसैनिकानं याबाबत आक्षेप घेतला नाही. आम्ही संघटनेत नेत्यावर निष्ठा ठेऊन काम करतो.बाळासाहेब ठाकरेंच्या प्रमाणं उद्धव ठाकरेंचं मोठेपण असावं. उद्धव ठाकरेंबाबत भाजप नेत्यांनी बोलू नये असं वाटणं ही माझी एकट्याची जबाबदारी नाही. तो सर्व शिवसैनिकांचा विषय आहे, असेही ते म्हणाले. मी काय उद्धव ठाकरेंचा प्रवक्ता नाही शिंदे साहेबांचा प्रवक्ता आहे. नारायण राणे खालून वर आलेले नेते आहेत, मला त्यांच्याशी काम करायला अडचण नसल्याचेही केसरकर यांनी सांगितले.