साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी
बदलती जीवनशैली आणि जंकफूडच्या आहारी गेलेल्या लोकांमध्ये पौष्टिक पदार्थ खाण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. हिरव्या भाज्या नेहमीच आरोग्यासाठी गुणकारी असतात. त्यांचे नियमित सेवन केल्याने त्या आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवते. हिरव्या भाज्यांमध्ये काही भाज्या कमी वेळेत अधिक परिणामकारक ठरतात. काटवल ही शरीरावर वेगाने परिणाम करणारी भाजी आहे. कटूले सर्वांत ताकदवान भाजी मानले जाते. ही भाजी अनेकदा औषध स्वरूपातही वापरली जाते.
शहरांमध्ये पावसाळ्यात रानभाज्या विकायला येतात. याच काळात शेतशिवारात काटवल ही वेलवर्गीय फळभाजी येते. ती भाजी फक्त पावसाळ्यात खायला मिळत असल्यामुळे त्या भाजीला खूप लोकांची पसंती असते. काटवलाचा बाजारभाव आता वाढला आहे. ८० ते ९० रुपये पाव, म्हणजेच ३२० रुपये किलो या किमतीत कटुल्याची (spiny gourds) विक्री होते. किंमत ऐकून धक्का बसेल एवढ्या दरात कटूले विकले जात आहेत.
पूर्वीपासून पावसाळ्यात कटूले हे फळभाजी म्हणून खाण्याची परंपरा आहे. ते चविष्ट नसले तरी अनेक आजारांवर लाभदायक आहे. या फळाची भाजी खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पूर्वी या फळभाजीला जास्त मागणी नव्हती. पण आरोग्याच्या दृष्टीने बघितले तर आता नागरिकांची ओढ नैसर्गिक वनस्पती आणि भाज्यांकडे वाढला आहे.
डोकेदुखीत काटवलाच्या पानांचा रस, मिरे, रक्तचंदन आणि नारळाचा रस एकत्र करून चोळतात. ही भाजी पोट साफ होण्यासाठी उपयुक्त आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी करण्यास मदत होते. त्याचबरोबर लघवीतील शर्करा नियंत्रित होते. मात्र काटवलाचे दर वाढल्याने ते घ्यावे की नाही, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.