लुटमारीचे आठ ते दहा लाखांचे गाठोडे गेले कुठे?

0
10

मुक्ताईनगर : प्रतिनिधी

शहरात २३ रोजी सायंकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान मुक्ताईनगर येथील बोदवड चौफुलीवर पी.एस.आय.बोरकर आणि सोबत असलेले कर्मचारी यांनी सिनेस्टाईलप्रमाणे जामनेरवरून येणारी इर्टिका गाडी अडवून ज्या दरोडेखोरांना ताब्यात घेतले. त्याप्रमाणे त्या गाडीत आठ ते दहा लाख रुपयाची रक्कम असलेले गाठोडे होते, अशी नागरिक चर्चा करत आहे. ज्या हॉटेलवर हा दरोडा पडला त्या हॉटेलवर कायमस्वरूपी क्लब चालविण्याचे चर्चिले जात आहे. हॉटेल मालक जामनेर येथील विशिष्ट राजकीय नेत्यांचे जवळचे असल्यामुळे गाठोडे दाबण्यात तर आले नाही ना? की त्याची प्रशासकीय ‘लेव्हललाच’ विल्हेवाट लावली असेल, अशी चर्चा सुज्ञ नागरिक करत आहे. या टवाळखोऱ्यांनी जळगाव जिल्ह्यात विशिष्ट क्लबवरच दरोडा टाकल्याचे चर्चिले जात आहे.

सावदा, पूर्णाड फाटा अश्ाा ज्या ठिकाणी क्लब चालतात, त्याठिकाणी करोडो रुपयांची उलाढाल होत असते. त्याच क्लबवर हे दरोडेखोर दरोडा टाकत असता, अशीही माहिती नागरिकांच्या चर्चेतून समोर आली आहे. मग हे ६० आणि ७० हजार लुटायला त्या हॉटेलवर का जातील? असा प्रश्नही सुज्ञ नागरिकांना पडला आहे. त्या अर्थी हॉटेलच्या क्लबवर मोठी बक्कळ रक्कम असल्याचेही चर्चिले जात आहे. गाठोडे कुठे फेकले किंवा कोणाला दिले? याबाबत प्रश्न उपस्थित होत असून तर्कवितर्क लावले जात आहे.

गाडीची व्हिडिओ शूटींग ‘डिलीट’

बोदवड चौफुलीवर रात्रीच्या सुमारास जी गाडी इर्टिका पकडली गेली. ती गाडी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला आणण्यात आली होती. त्यात डीवायएसपी शिंदे आणि पीआय मोहिते, सहकारी वर्ग त्या गाडीची सखोल चौकशी करत असताना मुक्ताईनगर येथील पत्रकार त्या इर्टिका गाडीची अधिकारी वर्ग चौकशी करतानाचा व्हिडिओ बातमी कव्हर करण्यासाठी पत्रकार व्हिडिओ काढत होते. परंतु त्या ठिकाणी डीवायएसपी शिंदे यांनी पत्रकाराचा मोबाईल हिसकावून व्हिडिओ शूटींग का काढत आहे, असा आरोप करून मोबाईलमधली व्हिडिओ शूटींग डिलीट केली. रिसायकलमध्ये असलेली सुद्धा डिलीट कर, असे कर्मचाऱ्याला सांगून संपूर्ण मोबाईलमधले व्हिडिओ शूटींग व फोटो डिलीट करण्यात आले. नेमके या व्हिडिओ डिलीट करण्यामागचे कारण काय होते. जामनेर येथील एका विशिष्ट राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्याचा हॉटेलवर हा दरोडा पडला आहे. म्हणून तर त्या गाडीची व्हिडिओ शूटींग पत्रकाराच्या मोबाईलमधील डिलीट केली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला ‘केराची टोपली’

सामान्य नागरिक पोलीस आवारात किंवा पोलीस स्टेशनमध्ये व्हिडिओ शूटिंग काढू शकतो, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे, अशा बातम्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. डीवायएसपी त्या आदेशाला केराची टोपली दाखवित कोर्टाचा अवमान करताना दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर लक्ष केंद्रित करून अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करतील का? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांमधून उपस्थित होत आहे. डीवायएसपीसारखे अधिकारी जर कोर्टाचा अवमान करत असेल तर सामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्नही नागरिकांमधून उपस्थित होत आहे. त्या गाडीमध्ये पैशाचे गाठोडे होते म्हणून व्हिडिओ डिलीट करण्यात आला, असा प्रश्न पत्रकारांना व नागरिकांना पडला आहे. ‘नशीबवान’ चित्रपटासारखा पैशाचे गाठोडे दाबण्यात आले, असे तर्कवितर्क लावण्यात येत असून नागरिक चर्चा करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here