मला अटक झाल्यावर मराठा समाज काय आहे? हे सरकारला कळेल : जरांगे पाटलांचा इशारा

0
14

धुळे : प्रतिनिधी

मराठा आरक्षणावरून काही दिवसांपूर्वी बीडमध्ये हिंसाचाराची घटना घडली होती. संतप्त आंदोलकांनी काही आमदारांच्या घरासह मालमत्ता आगीच्या हवाली केली होती. या प्रकरणावरून पोलीस प्रशासन ॲक्शनमोडमध्ये आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे तर अनेक आंदोलक पोलिसांच्या रडारवर आहेत. शिवाय बीड येथील हिंसाचार प्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनाही अटक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावर आता स्वत: जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“मराठा आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेतो, असे सरकारने म्हटले होते पण त्यांनी गुन्हे मागे घेतले नाहीत. त्यामुळे माझ्या अटकेची शक्यताही असू शकते. पण मला अटक करणं सरकारला तेवढं सोपं जाणार नाही. मला अटक करायची असेल तर करू द्या. मी तुरुंगात जायला घाबरत नाही. मला अटक झाल्यावर मराठा समाज काय आहे? हे सरकारला कळेल,” अशा शब्दांत मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिला आहे.
मराठा आंदोलकांच्या अटकेबाबत मनोज जरांगे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना आम्ही विनंती केली आहे की, आंदोलकांची अटक थांबवा. बीडमध्ये जे घडलं ते सत्य आहे. त्याचे आम्ही कधीही समर्थन केले नाही. पण तुम्ही निष्पाप लोकांना तुरुंगात टाकले आहे. तीन-चार हजार लोकांच्या याद्या केल्या आहेत.काही पोलिसांची जात उफाळून आली आहे.पोलिसांना कोणतीही जात नसते आणि नसायलाही पाहिजे. तरच राज्य शांत चालू शकते. लोकांनी पोलिसांवर रोष व्यक्त केला नाही पाहिजे. पोलीस हा आपला मित्र आहे. पोलीस आपल्याला आधार देणारा आहे. जातीय द्व्‌ेष करणारा नाही, अशी भावना पाहिजे.”
“माजलगावमध्ये हे सर्रास सुरू आहे. तिथे पोलिसांकडून लोकांबरोबर जातीवाद केला जातोय, हे व्हायला नाही पाहिजे. तेथील आमदारांच्या सांगण्यावरून कारवाया करायच्या, हे चांगलं नाही. उद्या त्यांना मराठ्यांच्याच दारात यायचं आहे. हे सगळं सरकार करत नसेल तर सरकारने हे थांबवायला हवे कारण गृहमंत्र्यापेक्षा कोणताही पोलीस मोठा असूच शकत नाही. गुन्हे मागे घेणार असल्याचे सरकारने सांगितले आहे. मग तुम्ही आमच्या लोकांना अटक का करत आहात? आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेतो, असे आश्वासन सरकारने दिले होते. उपोषण सोडून एक महिना झाला, पण सरकार काहीच करू शकले नाही. याचा अर्थ तुम्ही आमच्यावर कोणता डाव टाकला आहे.तुमचे डाव तुम्हाला परवडणार नाहीत. आम्ही अटक होऊ, तुरुंगात जाऊन बाहेर येऊ पण पुढचे डाव सरकारसाठी अवघड जातील. याचा सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा,” असेही मनोज जरांगे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here