साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेत मोठी फूट पाडली आहे. अद्यापही शिवसेनेत मोठी गळती सुरु आहे. यापार्श्वभूमीवर माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे आपले खरे गुरू आहेत. त्यांच्या विचारच्या प्रेरणेने आपण वाटचाल करीत आहोत. त्यामुळे आम्ही शिवसेनेत फूट पाडली, असे कोणी म्हणत असेल, तर ते चुकीचे आहे. आम्ही बाळासाहेबांचा विचार घेऊनच पुढील कार्य करीत आहोत, असे वक्तव्य पाटील यांनी केले.
गुरुपौर्णिमेनिमित्त काल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापुढे गुलाबराव पाटील नतमस्तक झाले.हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचे खरे दैवत आहेत. त्यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत कार्य केले,असे पाटील म्हणाले आहेत.
मागील ३८ वर्षांपासून एक नेता, एक विचार आणि एक झेंडा यांनाच प्रमाण मानून आपली राजकीय वाटचाल सुरू केली. तसेच भविष्यातही आपण त्याच मार्गावर चालणार आहोत. राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यामुळे काही जण आम्हाला चुकीच्या नजरेने पाहत आहेत. तसेच चुकीची टीकाही करीत असल्याचे पाटील म्हणाले.