वरणगावात खंडीत वीज पुरवठ्यामुळे पाणीटंचाईची समस्या?

0
13

साईमत, वरणगाव : प्रतिनिधी

शहरातील पाण्याची समस्या दिवसेंदिवस नागरिकांना त्रस्त करून सोडत आहे. नगर परिषदेच्या प्रशासनाकडून पाणीपुरवठा योजनेवरील वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने शहरातील पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होत असल्याचे सोयीस्करपणे उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे शहरात पाण्याची परिस्थिती बिकट होत असल्याने १५ दिवसानंतर होणारा पाणी पुरवठा किमान आठ दिवसाने केव्हा होईल? त्याची प्रतिक्षा शहरवासीयांना लागली आहे.

शहराला तापी नदी पात्रातून पाण्याची उचल करून जलशुद्धी केंद्राद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र, होणारा १५ दिवसानंतर अवेळी होत असल्याने शहरवासीयांमध्ये संतापाची लाट उसळत आहे. नदी पात्रात मुबलक साठा असूनही वरणगाव वासीयांना का वेठीस धरले जात आहे? असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. शहराला पाच जलकुंभाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र, जलकुंभात येणाऱ्या पाण्याला अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. बहुतांश वेळा जलवाहीनीला गळती लागते तर कठोरा येथील जॅकवेलवर होणारा वीजपुरवठाही वारंवार खंडीत होत असल्याने जलशुद्धीकरण केंद्राद्वारे जलकुंभात होणारा पाणी पुरवठा विलंबाने होतो. त्यामुळे शहराचा वाढता विस्तार पाहता जलकुंभातून पाणी पुरवठा करतांना कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र, कृत्रिम समस्येवर अद्यापही तोडगा निघाला नसल्याने शहरवासीयांना १५ दिवसानंतर पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

यासंदर्भात नगर परिषद प्रशासनाकडे विचारणा केल्यावर वीज वितरण विभागाकडून वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठ्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होत असल्याचे सोयीस्करपणे सांगितले जाते. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वतः वरणगाव शहराला भेट देऊन नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन राऊत यांना तातडीने उपाय योजना करण्याची सूचना दिली होती. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेला ‘केराची टोपली’ दाखविल्याने १५ दिवसानंतर होणारा पाणीपुरवठा किमान आठ दिवसाने केव्हा सुरु होईल? त्याची प्रतिक्षा नागरिकांना लागली आहे.

साठविलेल्या पाण्यात जंतूचा प्रादूर्भाव

शहरात १५ दिवसानंतर पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर पाण्याची साठवणूक करून ठेवावी लागत आहे. मात्र, साठतवलेल्या पाण्यात जंतुचा प्रादुर्भाव होत असल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे. त्यामुळे बहुतांश नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करीत पाण्याचे टँकर मागवून आपल्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावावा लागत असल्याने त्यांच्या मनामध्ये नगरपरिषद प्रशासनाविषयी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे.

विजेचे पोल केवळ नावालाच उभे

कठोरा तापी नदी पात्राच्या जॅकवेलवर सावतर-निंभोरा, कठोरे खुर्द- कठोरे बुद्रुक व अंजनसोंडे या गावांना तसेच या भागातील शेती शिवाराला वीज पुरवठा करणाऱ्या फिडरवरून वीज पुरवठा केला जातो. मात्र, या फिडरवर वीज पुरवठ्याचा अतिरिक्त ताण पडत असल्याने फिडरवरील वीज पुरवठा वारंवार खंडीत होण्याची समस्या नित्याचीच झाली आहे. त्यामुळे कठोरा येथील जॅकवेल येथे वीज पुरवठा करण्यासाठी वरणगाव फिडरवरून वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार लोकसभा निवडणुकीपूर्वी सुमारे दोन ते तीन किलोमिटर अंतरापर्यंत विजेचे पोल उभे करण्यात आले. मात्र, उभे केलेल्या पोलवर अद्यापही वीज वाहक तारांची जोडणी करण्यात आली नसल्याने जॅकवेलवरील वीज पुरवठ्याची समस्या अद्यापही कायम असल्याची स्थिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here