माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची माहिती
साईमत/यावल/प्रतिनिधी :
शहराची पुढील ३० वर्षांची लोकसंख्या गृहीत धरून शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पातून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेस महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाकडून २३ ऑगस्ट २०२४ मंजुरी मिळाल्याची माहिती माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दिली.
यावल शहराला पाणीपुरवठा सुरळीत व नियमित मिळण्यासाठी आराखडा तयार करून दरडोई १३५ लिटर पाणी पुरवठा व्हावा, म्हणून यावल नगरपालिकेने जुन २०२१ मध्ये पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजुर करून योजनेचा प्रस्ताव तयार करण्यासाठी नाशिक येथील सल्लागार समिती नेमुन कंपनीस काम दिले होते. त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. दरम्यान, शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प जलाशयातून पाणीपुरवठा योजनेकरीता पाणी आरक्षण मंजूर होणे गरजेचे होते. अखेर पाणी आरक्षण प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे.
प्रती नागरिक १३५ लिटरप्रमाणे पाणी उपलब्ध होणार
योजनेच्या सुमारे ८२ कोटी रूपयाच्या अंदाजपत्रकात तांत्रिक मंजुरी घेण्यात आली आहे. पाणी आरक्षण प्रस्तावास मान्यता आवश्यक होती. २.८२ दशलक्ष घन मिटर इतके पाणी यावल शहरातील नागरिकांना पिण्यासाठी आरक्षित केल्यामुळे योजना कार्यान्वित झाल्यावर प्रती नागरिक १३५ लिटरप्रमाणे पाणी उपलब्ध होणार आहे. योजनेस अद्याप प्रशासकीय मंजुरी नसुन शासन स्तरावर प्रलंबित आहे.
काम लवकर मार्गी लावण्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे प्रयत्नशील आहेत. याबद्दल जलसंपदामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतुल पाटील यांनी आभार मानले आहे. पाठपुरावा करणारे यावल नगर परिषदेचे अभियंता सत्यम पाटील यांचे आणि यावलचे मुख्याधिकाऱ्यांचेही आभार मानले आहे.