गिरणा धरणातही ९२ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा
साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी :
गेल्या महिन्याभरात सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील मोठे आणि मध्यम सिंचन प्रकल्पात लक्षणिय पाणीसाठा झाला आहे. विशेषत: मध्यम प्रकल्पांपैकी बोरी, सुकी, मंगरुळ आणि अभोरा या धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. तसेच जिल्ह्याच्या निम्मे भागाची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणात ९२ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाल्याने काही प्रमाणात गिरणा नदीही प्रवाहीत झाली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंतच्या एकूण सरासरीपैकी ९५ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे, पाझर तलाव पाण्याने भरले आहेत. हतनूर धरणात पाण्याची आवक कायम असून बुधवारपर्यंत धरणाचे आठ दरवाजे पूर्णपणे खुले केले होते तर आज शुक्रवारी चार दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरु होता. त्यामुळे तापी नदी वाहत आहे. वाघूर धरणाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून धरण ८२.७५ टक्के पाण्याने भरले आहे.
म्हसवे, भोकर बारी अन् अंजनी धरणात साठा कमीच
अंजनी, भोकर बारी आणि म्हसवे धरणात अपेक्षित जलसाठा झालेला नाही. अंजनी धरण आतापर्यंत २७ टक्केच भरले आहे. त्यामुळे गिरणा नदीतून वाहून जाणारे पाणी जामदा डाव्या कालव्याद्वारे अंजनी, भोकरबारी आणि म्हसवे धरणात सोडले जात आहे. यंदा बहुळा धरणात अपेक्षित पाणीसाठी झालेला नाही. फक्त ७.५६ टक्केच पाणीसाठा झालेला आहे.
मोठे सिंचन प्रकल्प आणि त्यातील पाणीसाठी (दशलक्ष घनमीटरमध्ये)
हतनूर – ८१.००, गिरणा-४८३.४०, वाघूर-२०५.६८