गुडघ्याच्या दुखापतीमुळे विनेश फोगटची माघार

0
3

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळालेल्या विनेश फोगटने गुडघ्याच्या दुखापतीमुळे चीनच्या हांगझो येथे होणाऱ्या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा तिने मंगळवारी केली. यामुळे राखीव खेळाडू अंतिम पंघालचा संघ समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
विनेश व बजंरग पुनिया यांना आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीत सूट दिल्याने वाद निर्माण झाला होता. भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहणाऱ्या हंगामी समितीने हा निर्णय घेतला होता. जकार्ता येथे २०१८ रोजी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या विनेशने ‘ट्विटर’च्या माध्यमातून आपल्या दुखापतीबाबत माहिती दिली.
१३ ऑगस्टला विनेशच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आणि १७ ऑगस्टला मुंबईत तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही ती सहभागी होऊ शकणार नाही. या स्पर्धेला ऑलिम्पिक पात्रतेचा दर्जा आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची निवड चाचणी २५ आणि २६ ऑगस्टला पतियाळात होणार आहे.पंघाल व सुजीत कलकल यांनी विनेश व बजरंग यांना थेट प्रवेश दिल्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले होते, पण उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती.
पंघालने निवड चाचणीत महिलांच्या ५३ किलो वजनी गटात, तर विशाल कालीरमणने पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात विजय नोंदवले होते. या दोन्ही मल्लांना राखीव खेळाडूंच्या यादीत स्थान देण्यात आले. हरियाणाच्या सिसाई गावात आयोजित खाप पंचायतही पंघाल व कालीरमण यांना संघात सहभागी करून घेण्याच्या पक्षात होती. ‘‘संबंधित अधिकाऱ्यांना माझ्या दुखापतीबाबत सूचित केले आहे, जेणेकरून राखीव खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकतील,’’ असे विनेश म्हणाली.
गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघार
श दोन दिवसांपूर्वी १३ ऑगस्टला सरावादरम्यान माझ्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. या दुखापतीची चाचणी केल्यानंतर चिकित्सकांनी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. मुंबईत गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडेल. मी गेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे माझे स्वप्न होते. मात्र, आता मला सहभाग नोंदवता येणार नाही.
– विनेश फोगट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here