साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील बोरखेडा येथे भील समाज मंडळातर्फे शुक्रवारी, ८ मार्च रोजी आदिवासी नायक महापराक्रमी वीर एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी साहित्यिक प्राचार्य डॉ.मिलिंद बागूल होते. यानिमित्त आदिवासी भिल्ल समाजाला नवी दिशा आणि ऊर्जा मिळावी, यासाठी खान्देशातील साहित्यिक तथा भिल्ल बोलीचे अभ्यासक सुनील गायकवाड यांचे व्याख्यान आयोजित केले होते. भिल्ल बोलीतून साधलेल्या संवादाने उपस्थित महिला भारावून गेल्या होत्या. सभेनंतर वीर एकलव्य यांच्या प्रतिमेची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यात ग्रामस्थ सहभागी झाले होते.
यावेळी विजयकुमार मौर्य, अनिल सुरळकर, सुनील सोनवणे, बापूराव पानपाटील, बोरखेडाचे सरपंच डॉ.विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय कोळी उपस्थित होते. भील समाजाच्या मोनी प्रशांत पिंपळे ह्या खुल्या प्रवर्गातून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार सुनील गायकवाड आणि सरपंच डॉ.विजय पाटील यांचे हस्ते करण्यात आला.
यशस्वीतेसाठी अध्यक्ष भगवान सोनवणे, सचिव किसन सोनवणे, सल्लागार आस्तिक अंभोरे, अनिल सोनवणे, आबा मालचे, सागर साळवे, निलेश सिरसाठ, प्रशांत पिंपळे, बादल मोरे, सुनील वैराळे, कैलास वाल्हे, नाना साळवे, समाधान पाटील, विठ्ठल पाटील, अंबादास पाटील, अशोक पाटील, राजेंद्र मोरे, संजय सोनवणे, जितेंद्र सिरसाठ, विकास साळवे, वासुदेव पवार, भरत सोनवणे, गुलाब नाईक यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन बोरखेडाचे रहिवासी प्रा.डॉ.सत्यजित साळवे यांनी केले.