सात्विक आहाराचा जीवनात उपयोग करणे काळाची गरज

0
12

साईमत जळगाव प्रतिनिधी

जुनं ते सोनं या म्हणीप्रमाणे आज मातीचे आरोग्य राखल्यास आपणासही सात्विक अन्न मिळू शकेल , सात्विक आहाराचा जीवनात उपयोग करणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी केले. जळगाव जनता सहकारी बँकेच्या बचत गटाच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी त्या बोलत होत्या.

या प्रसंगी व्यासपीठावर पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे, डॉ प्राजक्ता देवरे, बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, संचालक हरिश्चंद्र यादव, संचालिका संध्या देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नागमोती उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथि राहीबाई पोपेरे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथील असून त्यांना सन २०२० मध्ये देशी वाणांच्या बियाण्यांची जपवणूक केल्याबद्दल भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांची प्रकट मुलाखत उषा शर्मा यांनी घेतली. प्रकट मुलाखतीत पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या लहानपणापासून ते पद्मश्री पुरस्कारापर्यंतचा खडतर जीवनाचा प्रवास त्यांनी प्रश्नोत्तरमार्फत कथन केले. त्यांनी त्यांच्या प्रकट मुलाखतीत लहानपणापासून शेतीची असलेली आवड असल्यामुळे तसेच शारीरिक दृष्ट्या सेंद्रिय बियाण्यांचे महत्व लक्षात घेता बचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे महत्व पटवून देण्यास सुरुवात केली. त्यात त्यांना बाइफ संस्थेचेही सहाय्य लाभले.
राहीबाई यांच्याकडे अनेक प्रकारच्या जुन्या देशी पाल्याभाज्य व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केले आहे. राहीबाई यांच्या कडे असलेले बियाणे शेकडो वर्ष आपले पूर्वज खात होते ते मूळ स्वरुपात असल्याचे संगितले. त्यांनी देशी बियांनाची बँक सुरू केली. रानभाज्यांच्या बियासुद्धा या बीज बँकेमार्फत पुरविल्या जातात. जुनं ते सोनं या म्हणीप्रमाणे आज मातीचे आरोग्य राखल्यास आपणासही सात्विक अन्न मिळू शकेल म्हणून बियाण्यांची जपवणूक कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीस प्रास्ताविक बँकेच्या संचालिका संध्या देशमुख यांनी केले. त्यांनी ४५ वर्षात आर्थिक सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात तसेच बँकेमार्फत बचत गटांसाठी सुरू असणार्‍या विविध उपक्रमाबाबत माहिती दिली. प्राजक्ता देवरे यांनी उपस्थित महिलाना मार्गदर्शन करताना २१ व्या शतकात चंद्रावर पाऊल ठेवून सूर्याच्या अंतर आत्म्याचा वेध घेण्याची आपली संस्कृती आहे. जी सर्व विश्वाला प्रेरणा देणारी आहे. समाज सुधारणेकरिता महिलांचे सबलीकरण होणे गरजेचे असून स्त्रीचा मान व सन्मान ठेवला पाहिजे असे त्यांनी नमूद केले.
बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बचत गटाच्या उत्पादनाच्या मार्केटींगसाठी पॅकींग व लेबल आकर्षक असावे तसेच बचत गटाच्या उत्पादनाची माहिती व विक्रीसाठी मोबाईल, सोशल मिडीयाचा वापर करून प्रत्येक महिला डिजिटल साक्षर व्हायला पाहिजे असे सांगितले.
बँकेने बचत गटाच्या उत्पादनाला चालना मिळावी म्हणुन समृद्धी दालन सुरु केले आहे. यावेळी अध्यक्षांनी उपस्थित महिलाना सक्षम होण्यासाठी बँक सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्राजक्ता सातपुते यांनी केले, प्रमुख अतिथिंचा परिचय प्रियंका झोपे यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन नितिन चौधरी यांनी केले. स्वाति देशमुख यांनी म्हंटलेल्या पसायदान ने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी बँकेचे संचालक हरिश्चंद्र यादव, नितीन झवर, सुशील हासवाणी, संचालिका संध्या देशमुख तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नागमोती, वरिष्ठ महाव्यवस्थापक सुनील अग्रवाल, उपमहाव्यवस्थापक नितिन चौधरी, कपिल चौबे, कर्मचारी प्रतिनिधी ओंकार पाटील, हेमंत चंदनकर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमास सुमारे दोन हजारांच्यावर महिलांची उपस्थिती होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here