साईमत/ न्यूज नेटवर्क/चाळीसगाव :
प्लास्टिक बॅग्समध्ये असलेल्या रसायनांमुळे विविध प्रकारच्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. अशा रसायनांचा दीर्घकाळ संपर्क आल्यास कर्करोग, हार्मोनल विकार आणि इतर गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. यासाठी प्लास्टिकऐवजी पर्यावरणपूरक आणि स्वस्त अशा कागदी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन उपप्राचार्य प्रा. डी.एल.वसईकर यांनी केले.
येथील बी. पी. आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स महाविद्यालयात ४८ एनसीसी महाराष्ट्र बटालियन, धुळेच्या आदेशानुसार महाविद्यालयाचा एनसीसी विभागामार्फत आयोजित ‘पेपर बॅग्स डे’ कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. प्लास्टिक बॅग्सच्या वापरामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक धोक्यांविषयी त्यांनी सखोल माहिती दिली. कागदी पिशव्या नैसर्गिकरित्या विघटनशील असल्याने त्यांचा पर्यावरणावर कोणताही दुष्परिणाम होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
कागदी पिशव्या वापरचा केला संकल्प
कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह उपस्थित नागरिक, व्यापारी यांनी प्लास्टिक बॅग्स टाळण्याचा आणि कागदी बॅग्सचा अधिकाधिक वापर करण्याचा संकल्प केला.
बी. पी. आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प आणि प्रदर्शनांच्या माध्यमातून कागदी पिशव्यांच्या वापराचे महत्त्व स्पष्ट केले. पर्यावरणपूरक उपाययोजनांची माहिती देताना, आपल्या लहानशा बदलाने भविष्यातील पिढ्यांसाठी एक स्वच्छ आणि सुरक्षित पर्यावरण देण्यास मदत होईल, असे सांगून कागदी पिशव्यांच्या वापरावर भर दिला.
याप्रसंगी एन.सी.सी.विभागाचे प्रमुख मेजर डॉ. राजेश चंदनशिव, डॉ. पी.एस. नन्नवरे, प्रा. पंकज वाघमारे, डॉ. एस. वाय. पवार, एनसीसीचे सर्व विद्यार्थी, नागरिक, व्यापारी उपस्थित होते.