अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : व्हीनस विल्यम्स पहिल्या फेरीत बाद

0
1

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था

सात एकेरी ग्रँडस्लॅम विजेती टेनिसपटू व्हीनस विल्यम्सचे अमेरिकन खुल्या स्पर्धेतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. व्हीनसला अमेरिकन स्पर्धेतील आपल्या कारकीर्दीत सर्वात निराशाजनक पराभव पत्करावा लागला. त्याच वेळी पुरुषांमध्ये गतविजेता कार्लोस अल्कराझ आणि माजी विजेता डॅनिल मेदवेदेव यांनी मात्र आपल्या मोहिमेस यशस्वी सुरुवात केली.
वयाच्या 43व्या वर्षीही ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळण्याचे धाडस दाखवणाऱ्या व्हीनसला महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत पात्रता फेरीतून आलेल्या बेल्जियमच्या ग्रीट मिन्नेनकडून 1-6, 1-6 अशी हार पत्करावी लागली. विशेष म्हणजे व्हीनसने 1997मध्ये कारकीर्दीत प्रथम अमेरिकन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती आणि त्याच वर्षी मिन्नेनचा जन्म झाला होता. ‘‘व्हीनससारख्या महान खेळाडूबरोबर खेळायला मिळणे याचा मला अभिमान वाटतो. तिचाच खेळ बघत लहानाची मोठी झाले आणि कोर्टवर उतरले, अशी प्रतिक्रिया मिन्नेनने व्यक्त केली.
पुरुषांमध्ये विजेतेपदाच्या शर्यतीत केवळ अल्कराझ आणि जोकोविचच नाहीत, तर आपणही आहोत हे मेदवेदेवने एकतर्फी विजयाने दाखवून दिले. मेदवेदेवने हंगेरीच्या ॲटिला बालाझला टेनिसचे धडे देत 1 तास 14 मिनिटांत 6-1, 6-1, 6-0 असा सहज विजय मिळवला.
अल्कराझलाही पहिल्या विजयासाठी फारसे झगडावे लागले नाही. पहिल्या फेरीच्या सामन्यात प्रतिस्पर्धी डॉमिनिक कोएपफेरने माघार घेतल्याने अल्कराझला दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला. घोटय़ाच्या दुखापतीने कोएपफेरला 2-6, 2-3 अशा पिछाडीवरील स्थितीत लढतीतून माघार घ्यावी लागली.
महिला एकेरीत जेसिका पेगुला आणि ओन्स जाबेऊर यांनीही पहिल्या फेरीत सहज विजय मिळवला. पेगुलाने कॅमिला जॉर्जीचा 6-2, 6-2 असा, तर जाबेऊरने कॅमिला ओसोरियोचा 7-5, 7-6 (7-4) असा पराभव केला.
व्हिनस सर्वात वयस्क खेळाडू
43 पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला असला, तरी 43 वर्षीय व्हिनस विल्यम्स यंदाच्या अमेरिकन स्पर्धेत खेळणारी सर्वात वयस्क महिला खेळाडू ठरली. यापूर्वी वयाच्या 43व्या वर्षांनंतर बेटी प्रॅट (1968) आणि रेनी रिचर्डस (1779, 1980) यांनीच या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here