साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाच्या सहकार्याने ‘वॉल्टर क्लूवर’ कंपनीकडून मिळालेल्या सीएसआर फंडीगअंतर्गत चाळीसगाव येथील महिलांसह मुलींसाठी ‘उर्मी प्रकल्प’ राबविण्यात आला. उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील मुलींसह महिलांमध्ये मासिक पाळीबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि माहिती देणे होता. उर्मी टीममधील प्रांजली इनामदार यांनी २८ व २९ एप्रिल रोजी चाळीसगाव येथील गावांमध्ये तसेच शहरामधील वस्त्यांमध्ये जागरूकता सत्र घेण्यात आली. सत्रात मासिक पाळी आणि आरोग्य तसेच त्यासाठी राखायची स्वच्छता, योग्य आहार, व्यायाम व नॅपकिन्सची विल्हेवाट याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
ग्रामोदय प्रकल्पाचे वरिष्ठ समन्वयक अनिल पाटील, चाळीसगावमधील प्रकल्प समन्वयक पंकज राठोड, प्रवीण राठोड, स्थानिक रहिवासी यांनी सर्व अंगणवाडी सेविका, बचत गट प्रमुख यांच्याशी समन्वय साधण्याचे व सत्र नियोजनाचे कार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे व पुढाकारामुळे सत्र यशस्वीपणे पार पडली.
चाळीसगाव शहरातील विविध वस्त्या तसेच कळमडू, कुंझर, सुंदरनगर अशा गावांमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यात ८ सत्र घेण्यात आली. यावेळी ३८८ महिला, मुली आणि अंगणवाडी सेविका यांच्याशी संवाद साधला. सत्रानंतर अनेक महिलांनी त्यांच्या मनातील प्रश्नांविषयी अत्यंत मोकळेपणाने चर्चा केली. त्या-त्या भागातून निघताना महिलांनी सत्र खूप आवडल्याचे आवर्जून सांगितले. तसेच पुन्हा जरुर येण्याची विनंती केली.
बऱ्याच महिलांनी त्यांच्या सत्राबद्दलचे अभिप्राय व्हिडीओ स्वरूपात दिले. सर्व उपस्थितांना सत्रानंतर ‘वॉल्टर क्लूवर’ कंपनीतर्फे वर्षभरासाठीचे मैत्रिण हायजीन किटचे वाटप करण्यात आले. प्रत्येक मैत्रिण किटमध्ये सॅनिटरी नॅपकीन्सची पाकिटे, रिऊजेबल कापडी नॅपकिन तसेच उर्मी माहिती पुस्तिकेचा समावेश असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या सुचित्रा पाटील यांनी दिली.