साईमत त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर शहरात दोन तास मुसळधार पावसाने अक्षरशः कहर केला. आज सकाळी झालेल्या या जोरदार पावसामुळे मुख्य रस्त्यांसह उपनगरी भागात पूरस्थिती निर्माण झाली. घरे व दुकाने पाण्याखाली गेल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
वारकऱ्यांना चांगलेच हाल
आज इंदिरा एकादशी असल्याने त्र्यंबकेश्वरला सकाळपासून वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. मात्र पावसाच्या संततधारेमुळे भक्तांना चिखल व पाण्यातून वाट काढावी लागली. रस्ते नदीसारखे वाहू लागल्याने काही काळ वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला.
दोन तासांच्या मुसळधार पावसामुळे परिसरातील डोंगर-दऱ्यांमधून धबधबे प्रवाहित झाले. सप्टेंबर महिन्यात एवढा पाऊस अनेक वर्षांनी झाल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगतात. नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने त्र्यंबकवासीयांना अचानक आलेल्या मुसळधार पावसाचा फटका बसला.
शहरातील खालच्या भागात काही घरे व दुकाने पाण्याखाली गेल्याने किरकोळ नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. अचानक पाण्याच्या लोंढ्यामुळे व्यापारी व रहिवासी आपली मालमत्ता वाचवण्यासाठी धावपळ करताना दिसले.
पावसाचे पाणी लगेच वाहून न गेल्याने नागरिक त्र्यंबक नगरपरिषदेकडे रोषाने पाहू लागले. “रस्त्यांची स्वच्छता व नालेसफाई वेळेवर केली असती तर एवढे पाणी साचले नसते,” असा आरोप नागरिकांनी केला.