उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा

0
3

मुंबई : प्रतिनिधी

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीमुळे सत्तांतर झाले आहे. त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना अनपेक्षित धक्का देत देवेंद्र फडणवीसांसोबत सरकार (Devendra Fadnavis Govt) स्थापन केले. त्यानंतर शिवसेनेत मोठ्याप्रमाणात आउटगोइंग सुरू झाली आहे. शिवसेनेतील अनेक पदाधिकारी आणि नेते एकनाथ शिंदे गटात सामील होताना दिसत आहेत. त्यामुळे शिवसेनेतील होणारी गळती रोखण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर उभे ठाकले आहे. मात्र आता त्यांनी पक्ष संघटनेत नवी उभारी देण्याचा मोठा प्लॅन आखला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा असल्याने या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या समोर शिवसेनेतली सध्याची गळती रोखणे आणि पक्षाची पुन्हा बांधणी करण्याचे आव्हान आहे. उद्धव ठाकरे यांच्या समोर आगामी महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये पक्षाचे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी विजयी करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. त्यात शिवसेनेला पुन्हा जोमाने उतरवणे हे उद्धव ठाकरे पहिले लक्ष्य असणार आहे.

तसेच तळागळातील शिवसैनिक नेमका कुणासोबत? एकनाथ शिंदे यांच्यासोबत? की उद्धव ठाकरे यांच्यासोबत? या प्रश्नाचे उत्तरही उद्धव ठाकरे यांना या दौऱ्यात मिळणार आहे. बंडखोरांना जागा दाखवून देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे या निवडणुकांच्या माध्यमातून करणार आहेत. बंडखोरांची राजकीय कारकीर्द जास्त नाही, हे दाखवून देण्याचे प्रयत्न उद्धव ठाकरे करतील, असा अंदाज राजकीय पंडितांनी व्यक्त केला आहे. तसेच मी अजून मैदान सोडलेले नाही, मी मैदानात आहे हे दाखवण्यासाठी हे उद्धव ठाकरे यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. तसेच उद्धव ठाकरे या दौऱ्यात तरुणाईला आकर्षित करतानाही दिसून येतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here