साईमत यावल प्रतिनिधी
सातपुडा (Satpuda) पर्वतापासून ६० ते ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या जळगाव जिल्ह्यातील यावल वनविभाग उपवन संरक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील यावल वनपरिक्षेत्र पश्चिम भागात गेल्या महिना दीड महिन्याच्या कालावधीत बिबट्याने (Leopard) एका बालकावर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतानाच आज रात्री एक वाजेच्या सुमारास डांभुर्णी शिवारात मेंढपाळ कुटुंबातील आईच्या कुशित झोपलेल्या बालिकेला बिबट्याने उचलून नेऊन ठार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे वनपरिक्षेत्र पश्चिम आणि पूर्व भागासह संपूर्ण यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. वन विभागाने बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील शेत शिवारात गट क्र. ७४१ मध्ये मेंढपाळांचे ३ कुटुंब गेल्या ५ दिवसांपासून प्रभाकर चौधरी यांच्या शेतात मुक्कामी होते. गुरुवार दि.१७ एप्रिल रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास बिबट्याने या कुटुंबातील रत्नाबाई या दोन वर्षाच्या चिमुकलीला तिच्या आईच्या कुशीतून म्हणजे आईजवळ झोपलेली असताना उचलून नेऊन केळीच्या बागेत घेऊन गेला आणि तिथे त्याने त्या लहान बालिकेचे लचके तोडले. त्यामुळे बालिका जागीच ठार झाली.
कुटुंबीयांनी आरडाओरडा केली असली तरी रात्रीची वेळ असल्याने बिबट्या लागलीच पळून गेला. दरम्यान,या दुर्घटनेची माहिती मिळताच यावल तहसीलदार मोहनमाला नाझिरकर, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, पश्चिम विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी व अन्य सहकाऱ्यांचे पथक हे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.
या दुर्घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि शेतमजुरांसह नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. आधीच दिवसा वीज नसल्याने रात्री-अपरात्री शेतकऱ्यांना शेती शिवारात जावे लागते. यातच बिबट्याची दहशत पसरल्याने शेतात शेतमजूर काम करण्यासाठी नकार देत असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आल्याची संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे.या संतापजनक घटनेची माहिती मिळतात आ.चंद्रकांत सोनवणे यांनी निष्क्रिय अशा वनअधिकाऱ्यांना आपल्या शिवसेना स्टाईलने चांगलेच धारेवर धरले आणि बिबट्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
काही दिवसांपूर्वीच किनगाव नजीक एक बालक बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला होता. यापाठोपाठ आता बालिका ठार झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. नरभक्षक बिबट्याला लहान मुलांच्या रक्ताची चटक लागल्याने बिबट्याला पकडण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. पश्चिम वनविभाग बिबट्याचा बंदोबस्त करण्यामध्ये निष्क्रिय ठरत असल्याने याकडे लोकप्रतिनिधींचे सुद्धा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.