कर्तव्यातील निष्काळजीपणा भोवला
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
पोलीस दलाच्या शिस्त व कर्तव्यनिष्ठेला धक्का देणारी गंभीर घटना जळगाव पोलीस मुख्यालयात उघडकीस आली असून, कर्तव्यातील निष्काळजीपणा आणि शिस्तभंग केल्याप्रकरणी दोन पोलीस अंमलदारांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांनी कठोर भूमिका घेत ही कारवाई केली असून संपूर्ण विभागात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९.२० वाजता राखीव पोलीस निरीक्षकांनी पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावरील गार्ड ड्युटीची अचानक तपासणी केली. या तपासणीत सफौ/१३७८ संभाजी निबाजी पाटील आणि पोना/३९३ प्रदीप भगतसिंग राजपूत हे दोन्ही अंमलदार आपल्या कर्तव्यस्थळी अनुपस्थित असल्याचे आढळून आले.
तपासणीदरम्यान आणखी गंभीर प्रकार समोर आला. गार्ड रूममध्ये ठेवलेल्या तीन एसएलआर रायफल्सपैकी बट क्रमांक ८२.२६२.८८२ असलेली रायफल दारूगोळ्याविना आणि कोणतीही सुरक्षा व्यवस्था न ठेवता बेवारस अवस्थेत आढळली. संवेदनशील ठिकाणी शस्त्रसाठ्याबाबत झालेली ही हलगर्जी अत्यंत गंभीर मानली जात आहे.
या प्रकारानंतर करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत संबंधित अंमलदारांचे वर्तन महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन करणारे असल्याचे स्पष्ट झाले. कर्तव्यच्युती आणि शिस्तभंगाचा गंभीर प्रकार समोर आल्याने पोलीस अधीक्षकांनी तात्काळ निलंबनाची कारवाई केली.
निलंबन कालावधीत दोन्ही अंमलदारांचे मुख्यालय जळगाव पोलीस मुख्यालय येथेच राहणार असून, वरिष्ठ परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
या घटनेनंतर पोलीस दलातील अंतर्गत शिस्त, गार्ड ड्युटी व्यवस्थापन आणि शस्त्रसाठा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संपूर्ण विभागात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
