राष्ट्रीय महामार्गावर खासगी बस उलटून दोन ठार

0
4

साईमत, एरंडोल : प्रतिनिधी

तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पिंपळकोठा गावाजवळ खासगी लक्झरी बस उलटून अपघाताची घटना शनिवारी, १६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. त्यात एरंडोल ते जळगाव दरम्यान पिंपळकोठा गावाजवळ ३० प्रवासी असलेल्या स्लीपर लक्झरीचा अपघात झाल्याने चालकासह सहचालकाचा मृत्यू झाला. तसेच उर्वरित प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले होते. दरम्यान, यासंदर्भात एरंडोल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी ती तातडीने सुरळीत केली.

सविस्तर असे की, जळगाव ते एरंडोल दरम्यान असलेल्या पिंपळकोठा गावाजवळ चौधरी कंपनीच्या लक्झरी बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने ही बस नाल्याच्या खाली जाऊन कोसळली. प्रत्यक्षदर्शीनुसार दुभाजकावर आदळल्यामुळे हा अपघात घडला. त्यात बसमधील बारा प्रवासी जखमी झाले असून त्यातील दोन जण ठार झाले आहेत.

एरंडोल तालक्यातील पिंपळकोठा गावानजीकच्या नाल्यात चौधरी यात्रा कंपनीची निमकथाना (राजस्थान) जिल्ह्यातून येणारी आणि औरंगाबादकडे जाणारी शयनयान खासगी बस कोसळली. त्यात चालकासह सहचालकाचा मृत्यू तर १२ प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी मदतकार्य सुरू केले. एरंडोल येथील पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येत मृतांसह जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयासह जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यास मदत केली.

अपघातातील जखमींची नावे अशी

अपघातात दिपेंद्र कुमार, दिनेश कुमार, रतनलाल कुमावत, जयराम कुंभार, महादेव कुंभार, राजेंद्र प्रजापती, सिताराम कुमार, मुकेश गुजर, लक्ष्मी जांगेड आणि दोन अनोळखी असे १२ जण जखमी झाले आहे. संबंधित बस ही श्री चौधरी ट्रॅव्हल्स कंपनीची होती. बसचा क्रमांक एआर ०१ वाय ०००९ असा होता. पोलिसांनी यासंदर्भात बस चालकाकडून माहिती मिळवून तपास करण्यास प्रारंभ केला. तसेच जखमी प्रवाशांच्या नातेवाईकांनाही अपघाताची माहिती देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here