प्रहार जनशक्तीचे दोन उमेदवार जाहीर

0
27

महायुती आणि मविआच्या उमेदवारांचे टेन्शन वाढणार

साईमत।नाशिक।प्रतिनिधी।

प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू नाशिक दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी मेळावा घेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फिल्डिंग लावल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी जिल्ह्यातील १५ पैकी दोन मतदारसंघातील उमेदवार देखील जाहीर केले आहेत. त्यामुळे महायुती आणि मविआच्या उमेदवारांचे टेन्शन वाढणार आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने निफाड येथे घेण्यात आलेल्या मेळाव्यात भाजप ओबीसी राज्य सरचिटणीस व माजी निफाड पंचायत समिती उपसभापती गुरुदेव कांदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यानंतर कडू यांनी निफाड मतदारसंघातून गुरुदेव कांदे यांना तर चांदवड मतदारसंघात प्रहार संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. आता निवडणुकीच्या दरम्यान निफाड आणि चांदवड विधानसभा मतदारसंघात त्रिशंकू लढत पाहायला मिळणार आहे.

विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीची आमदार बच्चू कडू यांच्याकडून जोरदार जमवाजमव सुरू आहे. तिसऱ्या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वराज्य या पक्षांसह प्रहारचा समावेश असेल असे कडू यांनी जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here