साईमत/ न्यूज नेटवर्क/ लोहारा, ता.पाचोरा :
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘माणुसकी रुग्णसेवा समूहाचे’ जळगाव जिल्हाध्यक्ष तथा समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पावसाळा असल्याने साथरोग आशयासंदर्भात विचारणा केली. तेव्हा सर्व ग्रामपंचायत स्तरावर पाणी तपासणी, टीसीएल साठा अद्ययावत ठेवणे, पाईपलाईन गळतीबाबत पत्र देण्यात आले आहे. औषधसाठा दोन ते तीन महिने पुरेल एवढा उपलब्ध आहे, अशी माहिती मिळाली. तसेच साथरोग पथक तयार केले आहे. यावेळी मुख्यालयीन कर्मचारी, वैद्यकीय अधीक्षक, औषधी निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, शिपाई सर्व कर्मचारी हजर होते. मात्र, आरोग्य सहाय्यक दयाराम नेटके हे गैरहजर होते. त्यामुळे सरकारी पगार घेऊन कर्तव्यात कसूर करत असल्याने आरोग्य सहाय्यक यांची त्वरित बदली करावी, अशी मागणी लोहारा ग्रामस्थांसह ‘माणुसकी रुग्णसेवा समूहाच्या’ सदस्यांनी केली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील भेटीत विचारपूस केल्यावर ते लसीकरणसाठी रजिस्टरला नोंद करून गेले आहेत. तसेच हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करून गेले असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. तात्काळ वैद्यकीय अधिकारी डॉ. शेखर पाटील यांना कॉल करून त्यांना सविस्तर माहिती सांगितली. तेव्हा त्यांनी सांगितले की, परंतु आज कुठेही लसीकरण सत्र नसल्याने ते विनापरवानगी गैरहजर आहेत. तसेच आरोग्य सहाय्यक दयाराम नेटके हे वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांशी कुठल्याही प्रकारचा समन्वय ठेवत नाही. ते वैद्यकीय अधिकाऱ्यांची परवानगी न घेता मुख्यालय सोडून जातात. त्यांचा प्राथमिक आरोग्य केंद्रातील अहवाल, ऑनलाइन कामकाजाची माहिती, लसीकरण कार्यक्रम व मोहीम यात सहभाग राहत नाही. त्यामुळे लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्रात अडचणी निर्माण होत आहेत. यासंदर्भात यापूर्वीही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिले आहेत. त्यावर अद्यापही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
रिक्त पदे भरण्याची गरज
प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक एक पद, आरोग्य सहायिका दोन पद, शिपाई एक पद, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही पदे रिक्त असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.शेखर पाटील यांनी दिली. त्यामुळे रिक्त पदे आरोग्य खात्याने त्वरित भरावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.